देऊळगाव राजा : शहरातील सातेफळ रस्त्यावर अनिल रामाने ते सिव्हिल कॉलनीमधील डॉ. भगवान खरात यांचे घरापर्यंत डीप रोड आहे, मात्र तांत्रिक अडचणीमुळे या मार्गाचे बांधकाम गेल्या ३० वर्षांपासून रखडलेले होते़ यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकासह पादचाऱ्यांना खूप त्रास होत होता़ पावसाळ्यात तर अनेकांच्या दुचाकी घसरून अपघात घडलेले आहेत़ या मार्गाचे पक्के बांधकाम व्हावे याकरिता शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दीपक बोरकर व या प्रभागाच्या नगरसेविका रेखा बोरकर यांनी पुढाकार घेतला. तांत्रिक अडचणी दूर रस्त्याचे पक्के सिमेंट काँक्रीटचे बांधकाम पूर्ण करून घेतले़
सिव्हिल कॉलनीतील सातेफळ मार्गाला जोडणारा अनिल रामाने ते डॉ.भगवान खरात यांचे घरापर्यंत च्या रस्त्याची दुरवस्था झाली होती़ या रस्त्याचे पक्के बांधकाम करण्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण झालेली होती़ गेल्या ३० वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता़ दीपक बोरकर यांनी तत्कालीन माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर व नगराध्यक्ष सुनीता शिंदे यांच्यासोबत चर्चा करून या कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली़ डॉ.खेडेकर व शिंदे यांनी संबंधित अधिकारी यांचेसोबत बैठक घेऊन तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सूचविले़ त्यानंतर नगर परिषद ने या कामासाठी ठराव घेऊन निधी मंजूर करून आणला व या रस्त्याचे पक्के बांधकाम पूर्ण केले, हे बांधकाम पूर्णत्वाला नेण्यासाठी शिवसेना उप जिल्हाप्रमुख दीपक बोरकर व या प्रभागाच्या नगरसेविका रेखा बोरकर यांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला़