लोणार (जि. बुलडाणा): जागतिक दर्जाच्या लोणार सरोवराचे जतन आणि संवर्धन करुन त्यामधील वनसंपदा, प्राणीसंपदांचे जतन करण्यात मुख्य भूमिका बजावणार्या वन विभागाकडूनच सरोवराला धोका निर्माण केला जात आहे. सरोवर परिसरात ५00 मीटर अंतरावर खोदकाम करण्यास बंदी असतानाही वन विभागाने रस्ता तयार करण्यासाठी सरोवराचा काठ खोदून टाकल्याचे ५ फेब्रुवारी रोजी उघडकीस आले आहे. शासनाने ८ जून २000 मध्ये सरोवर व त्यालगत असलेल्या ३८३.२२ हेक्टर परिसरास जगातील सर्वात लहान अभयारण्य म्हणून घोषित केले होते. या अभयारण्याचा परिघ ४ किलोमीटरएवढा आहे. या परिसराचे जतन करण्याची जबाबदारी प्रामुख्याने वनविभागाची आहे; मात्र वन विभागानेच सरोवराचे काठ खोदून काठावरील गौण खनिजाने रस्त्याचे काम केल्याने सरोवर काठाला तडे गेले आहेत, यामुळे सरोवराला धोका निर्माण होऊ शकतो. सरोवरापासून ५00 मीटरपर्यंत कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्यात येऊ नये, असे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे ९ मार्च २0१0 ला दिलेले आदेश असताना यापूर्वीसुद्धा वनविभागाच्या अधिकार्यांनी न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत काठावर गरज नसताना विना परवानगी वन निर्वाचन केंद्र उभारली. आता तर या अधिकार्यांनी सरोवराचे काठच खोदून रस्ता बनविण्याचा प्रताप केल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान लोणार सरोवर विकास समिती सदस्य सुधाकर बुगदाणे यांनी या प्रकारावर चिंता व्यक्त के ली. वनविभागाकडून सातत्याने सरोवराला धोका निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातो. यापूर्वीही ५५ लाख रुपये खर्च करुन सरोवराला तयार करण्यात आलेल्या तार कुंपनात गैरप्रकार झाल्याने हे कुंपन कुचकामी ठरले आहे व आता तर थेट सरोवराचा काठच खोदून काढल्याने या प्रकाराची चौकशी करुन कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. लोणारचे वन परिक्षेत्र अधिकारी बी. पी. चव्हाण यांनी सरोवराचा काठ खोदून रस्त्यावर मुरुम टाकण्याचे आदेश स्वत: दिले असल्याचे सांगुन न्यायालयाच्या आदेशाबाबत अनभिज्ञता व्यक्त केली.
लोणार सरोवराचा काठ खोदून रस्त्याचे काम !
By admin | Updated: February 7, 2015 02:26 IST