लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा: तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी बुधवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. येथील टाऊन हॉलमध्ये उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत, नायब तहसीलदार अंगद लटके यांच्या उपस्थितीत यश संतोष जैवळ या लहान मुलाच्या हातून चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले.
तालुक्यातील २०२० ते २०२५ पर्यंत ही आरक्षण सोडत लागू असणार आहे. दरम्यान,तालुक्यात नुकत्याच ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या. निवडणुकीपूर्वी काढण्यात आलेले सरपंच पदाचे आरक्षण तांत्रिक अडचणींमुळे रद्द करण्यात आले होते. त्यामुळे नव्याने आरक्षण सोडत होणार असल्याने आणि त्यात निवडणुका झाल्याने या सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. बुधवारी निघालेल्या सोडतीत सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा येथील सरपंच पद सर्वसाधारण वर्गासाठी राखीव असणार आहे. त्यामुळे आरक्षणातील अनेकांच्या इच्छा मारल्या गेल्या आहेत. दुसरी मोठी ग्रामपंचायत असलेल्या दुसरबीडमध्येही ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण आल्याने येथे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींना हा निर्णय पचनी पाडून घ्यावा लागणार आहे. किनगाव राजा येथेही सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षण सुटले आहे. गारखेड्यात गड आला पण सिंह गेला, अशी गत सात सदस्य असलेल्या गारखेडा ग्रामपंचायतीत विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. येथे राष्ट्रवादी पुरस्कृत ७ सदस्यांनी नामांकन भरले होते; परंतु तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने एका सदस्याला आपला वॉर्ड सोडून अन्य वॉर्डमध्ये निवडणूक लढवावी लागली; पण येथे त्या उमेदवाराचा पराभव झाला. त्या जागेवर एकमेव अनुसूचित जाती प्रवर्गाचा उमेदवार विजयी झाला आणि आजच्या सोडतीत सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठीच निघाल्याने राष्ट्रवादी पुरस्कृत गटाचा मोठा विजय होऊनही त्यांना सरपंच पद गमवावे लागण्याची शक्यता आहे.
चौकट...
असे असेल आरक्षण
सर्वसाधारण: उमनगाव, राजेगाव, गोरेगाव, मोहाडी ,सोयंदेव, वाघोरा, लिंगा पांगरी काटे, धांदरवाडी, तांदूळवाडी, रताळी, पिंपळगाव सोनारा, जउळका, वाघजाई, पिंपळगाव लेंडी ,चांगेफळ, राहेरी बुद्रुक, शिंदी, वडाळी, निमगाव वायाळ, चिंचोली जहागीर, पिंपळगाव कुडा, अंचली ,डावरगाव, गुंज ,देवखेड ,विझोरा, देऊळगाव कोळ, सावरगाव माळ, जांभोरा ,नशिराबाद ,जागदरी ,हनवतखेड (सिंदखेड राजा) हिवरा गडलिंग ,साखरखेर्डा, भंडारी, नाईक नगर, वसंत नगर, दत्तापूर.
नागरिकांचा मागास प्रवर्ग: कोनाटी, वरुडी,आडगाव राजा, जळगाव ,सवडद, पळसखेड चक्का,ताडशिवणी, बाळ समुद्र, सोनोशी, खैरव ,महारखेड ,मलकापूर पांग्रा, तढेगाव, दरेगाव ,सुलजगाव ,भोसा, केशव शिवणी, सायाळा, दुसरबीड, वाघाळा, झोटींगा ,शेंदुर्जन.
अनुसुचित जाती: साठेगाव ,धानोरा ,सावखेड तेजन ,खामगाव, कंडारी, पांगरी उगले, हिवरखेड ,पिंपळखुटा, शिवनी टाका, उमरद, वरदडी बुद्रुक ,डोरव्ही, हनवतखेड (म. पांग्रा नजीक )आंबेवाडी, पोफळ शिवणी, कुंबेफळ, गारखेड पिंपरखेड बुद्रुक.
अनुसूचित जमाती: रूम्हणा हे एकमेव आरक्षण सोडत निघाली आहे.