खामगाव : शहर व परिसरात सोमवारी रात्री रिमझिम पाऊस बरसला, तसेच मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. यामुळे अवर्षण व दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी आशा पल्लवित झाल्या असून, तालुक्यातील अनेक गावांत यामुळे धूळपेरणीला सुरुवात झाली आहे. बागायती शेतकऱ्यांकडून दरवर्षी अक्षय्यतृतीतेच्या मुहूर्तावर धूळपेरणी करण्यात येते; मात्र गतवर्षी परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने परिसरातील विहिरींची जलपातळी कमालीची घटली होती. त्यामुळे दरवर्षी दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी यावर्षीही पाऊस वेळेवर पडेल की नाही, या शंकेने धूळपेरणी केली नाही; मात्र आता पावसाची आशा लागल्याने तसेच पेरणीची वेळ आल्याने धूळपेरणीला सुरुवात केली आहे. इतर शेतकऱ्यांनीही पेरणीपूर्व मशागत पूर्ण करून पेरणीसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे.खामगावात १९ मि.मी. पावसाची नोंदपरिसरात सोमवारी रात्री पावसाने जोरदारी हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या या पावसामुळे शहरातील तापमानात घट जाणवली. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी लवकर मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून चिखली तालुक्यासह जिल्ह्यातील काही भागात पाऊस होत आहे. दरम्यान, सोमवारी रात्री १ वाजता शहर व परिसरात पावसाचे आगमन झाले. जवळपास पाऊणतास जोरदार पाऊस झाला. या पावसाची नोंद १९ मि.मी. इतकी करण्यात आली आहे.
रिमझिम पावसामुळे पेरणीसाठी लगबग!
By admin | Updated: June 7, 2017 00:04 IST