लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खामगाव येथे शासकीय कापूस खरेदीसाठी सीसीआयचे केंद्र सुरू होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीला सुरूवात झाल्याचे बाजार समितीचे प्रशासक आे.एस.साळुंके यांनी सांगितले. आता लवकरच खरेदीला प्रारंभ होणार आहे. शासनाने यंदा लांब धाग्याच्या कपाशीला ५८२५ रुपये प्रती क्विंटल हमीदर घोषित केले आहेत. जिल्ह्यात मात्र व्यापा-यांकडून प्रती क्विंटल ५ हजार रुपये भाव दिला जात आहे. हमीदरापेक्षा ८०० रुपये कमीदराने शेतक-यांना कपाशी विकावी लागत आहे. त्यामुळे शेतक ऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. त्यामुळेच शेतकरी कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. त्यानंतर आता केंद्रीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीची तयारी केली आहे. कापूस पणन महासंघाचे तीन आणि सीसीआयचे चार मिळून सातच केंद्रे राहणार आहेत. कापूस पीक क्षेत्राचे प्रमाण पाहून खरेदी केंद्राची निश्चिती करण्यात आली आहे. विविध केंद्रामध्ये १ डिसेंबरपर्यंत कापूस खरेदीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. १३ पैकी सात तालुक्याच्या ठिकाणीच खरेदी होणार आहे. त्यामुळे उर्वरित सहा तालुक्यातील शेतकऱ्यांना लगतच्या तालुका केंद्रात कापूस विक्री करावी लागणार आहे.
खामगाव येथे कापूस खरेदीसाठी नोंदणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 16:10 IST