बुलडाणा : काेराेनामुळे शासनाने कर्मचारी भरतीवर बंदी आणली आहे. या बंदीतून पवित्र पाेर्टलवरील शिक्षक भरती वगळण्याचे आदेश शासनाने ७ डिसेंबर राेजी निर्गमित केले हाेेते. मात्र, पवित्र पाेर्टलवर कुठल्याही सूचना आल्या नसल्याने उमेदवार संभ्रमात आहेत.
विविध कारणांनी पवित्र पाेर्टलवरील शिक्षक भरती रखडलेली आहे. काही उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर शिक्षक भरतीला ब्रेक लागला हाेता. मुलाखतीविना शिक्षक भरतीची प्रक्रिया पार पडली आहे. आता उमेदवारांना मुलाखतीसह हाेणाऱ्या शिक्षक भरतीची प्रतीक्षा आहे. पवित्र पाेर्टलवर २० ऑगस्टला ज्या उमेदवारांना ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत त्यांना खासगी माध्यमिक शाळेसाठी उत्तीर्ण आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी किमान द्वितीय श्रेणी असणाऱ्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम देण्याची सुविधा देण्यात आली हाेती. ७ नाेव्हेंबर राेजी खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी उच्च वयोमर्यादा लागू करण्यात आलेले होती. त्यामुळे कमाल वय याकारणास्तव ज्या उमेदवारांना मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत. त्यांना १७ नाेव्हेंबरपर्यंत प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आले हाेते. ७ नाेव्हेंबर नंतर पवित्र पाेर्टलवर कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत. दुसरीकडे काेराेनामुळे आर्थिक परिस्थिती ढासळल्याने शासनाने कर्मचारी भरतीवर बंदी घातली हाेती. त्यामुळे पवित्र पाेर्टलवरील शिक्षक भरतीही धाेक्यात आली हाेती. मात्र, शासनाने ७ डिसेंबर राेजी आदेश काढून बंदीतून पवित्र पाेर्टलवरील शिक्षक भरती वगळली आहे. त्यामुळे, भावी शिक्षकांना दिलासा मिळाला असला तरी अद्यापही प्रक्रिया सुरू हाेण्याची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे.