लोकमत न्यूज नेटवर्कधाड : धाड परिसरात ५ जून रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वारा व पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली तसेच जनजीवन विस्कळीत झाले. धाडसह परिसरात घरांवरील पत्रे उडाली असून, शिवारात वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली. रात्रीच्या पावसात वाऱ्याचा जोर अधिक असल्याने शेतशिवारातील गोठ्यांमधील जनावरांचे वैरण भिजले. पावसाने रात्री विद्युत पुरवठा खंडित झाला होता. सकाळी उशिरापर्यंत सुरळीत झाला नव्हता. पावसाने अपेक्षेपेक्षा आधीच जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. सध्या कर्जमाफीसाठी सर्वत्र शेतकरी व विविध संघटना रस्त्यावर आल्याने खरिपाची तयारी करणाऱ्या शेतकरी वर्गास संभ्रम निर्माण झाला आहे. बी-बियाणे, खते, शेती मशागत, पेरणीपूर्व तयारी आदी कामांचे नियोजनात व्यस्त झालेल्या शेतकरी वर्गास अखेर हंगामाच्या सुरुवातीलाच आंदोलन करण्याची वेळ आल्याने, शेतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यात वरूणराजाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर घातली आहे. शेतकरी सध्या शेतीची आंतरमशागत करण्यात व्यस्त दिसत आहे. खरिपाचा पेरणी हंगाम मात्र शासनाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
धाड परिसरात पावसाने जनजीवन विस्कळीत
By admin | Updated: June 7, 2017 00:17 IST