जळगाव जामोद (जि. बुलडाणा): तालुक्यातील पूर्णा नदीला आलेला पूर ६ आॅगस्ट रोजी कायम होता. गुरुवारी दिवसभर पुलावरुन १५ फूट पाणी वाहत होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या ग्राम दादुलगाव येथील निवृत्ती नारायण झाल्टे वय ४२ या इसमाचा गाळात फसून मृत्यू झाल्याची घटना ६ आॅगस्टच्या सकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली.दादुलगाव शिवारात सदर इसम आपल्या शेतातील मोटार इंजीन काढण्यासाठी गेला तेव्हा तो नाल्यात उतरला. पूर्णेचे बॅक वॉटर असल्याने नाल्यात प्रचंड गाळ साचून पाणी तुंबले होते. तो नाल्यात जाताना गाळात फसला व त्याला निघता येत नव्हते. यावेळी गावातील लोक येईपर्यंत निवृत्ती गाळात फसून मृत्यू पावला होता. शवविच्छेदन करून दादुलगाव येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, चार मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. ४ आॅगस्ट रोजीपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून, या दोन दिवसात जवळपास ३१० मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे परिसरातील नदीनाले तुडुंब होतील, तर पूर्णेला महापूर आला त्यामुळे आजही दिवसभर मुक्ताईनगर आणि धुपेश्वर मार्गे एस.टी. बस सुरू होत्या.