आ. श्वेता महाले यांनी २२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी, आयुक्त आणि बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्याचे प्रशासकीय समन्वयक यांच्याशी संपर्क साधून पत्र देऊन बुलडाणा जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा वाढीव कोटा मिळावा, अशी मागणी केली होती. त्यावर जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी २४ एप्रिल रोजी जिल्ह्यासाठी ऑक्सिजनची मागणी एफडीए आयुक्तांकडे नोंदविली आहे. ऑक्सिजनची आवश्यकेतनुसार मागणीच नसल्याने जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला होता. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी प्रशासनाने केली होती; परंतु खासगी दवाखान्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीची नोंदणीच केलेली नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत होता. या पृष्ठभूमीवर खासगी रुग्णालयांना लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीप्रमाणे नोंदणी करून पुरवठा करण्याची मागणी आ. महाले यांनी केली होती. यानुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी एफडीएला दिलेल्या पत्रातदेखील ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या एजन्सीजनी खासगी दवाखान्यांचा ऑक्सिजन पुरवठा थांबविला असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यात आज रोजी ७ हजार ४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे खासगी डीसीएच, डीसीएचसी यांना ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत व पुरेसा करण्याबाबत कडक निर्देश संबंधित पुरवठादार एजन्सीजना देण्याची विनंती जिल्हाधिकारी यांनी एफडीए आयुक्तांकडे केली असून दैनंदिन रुग्णवाढ लक्षात घेता खादगी दवाखाने, खादगी डीसीएच व डीसीईसी यांना ८.०१ मे.टन तर शासकीय डीसीएच (डीसीईसीटी सीसीसी) यांना ६.५ असा एकूण १४.५१ मे.टन ऑक्सिनजनचा पुरवठा करण्याची विनंती करण्यात आल्याने आ. श्वेता पाटील यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गरज १३ मे.टनची, मिळते ६ मे.टन!
बुलडाणा जिल्ह्याला सद्य:स्थितीत शासकीय डीसीएच ३, शासकीय डीसीएचसी ६, शासकीय सीसीसी २४, खासगी डीसीएच १२, तर खासगी डीसीएचसी ३१ कार्यरत आहेत. शासकीय रुग्णालयात दररोज ४.४४ मे.टन, खादगी दवाखान्यात ८.०१ मे.टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्याला केवळ ६ मे.टन एवढा ऑक्सिजन पुरवठा होत आहे.