बुलडाणा : लोणार तालुक्यातील बिबी येथे कायमस्वरूपी दारुबंदी करण्याची मागणी मागील काळात झाली आहे. येथील महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे स्वाक्षरी व अंगठय़ासह या मागणीचे निवेदन दिले. त्यानुसार लोणार तहसीलदार यांच्याकडील मतदार यादीवरून बिबी येथील एकूण महिला मतदारांची संख्या १५३५ आहे. निवेदनानुसार महिलांच्या सह्यांची, अंगठय़ाची पडताळणी केल्यानंतर २५ टक्के म्हणजे ३८४ महिलांनी तहसीलदार यांच्या समक्ष दारूबंदीकरिता मान्यता दिल्यास बिबी येथे दारूबंदीसाठी मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येईल. मतदानाची प्रक्रिया सात दिवस आधी जाहीर करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी केले आहे. बिबी महिलांनी दारूबंदीसाठी त्यांच्या सह्या व अंगठय़ासह निवेदन दिले. नियमानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ५ व ८ जून २0१५ रोजी सह्यांची, अंगठय़ांची पडताळणी करण्यात आली. पडताळणीमध्ये मतदार यादीमधील महिलांची संख्या व पडताळणीत दिसून आलेल्या महिलांच्या संख्येत शासकीय अटी व मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे; मात्र याची पडताळणी पुन:श्च व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी यांना विनंती केली. त्यानुसार ३ सप्टेंबर २0१५ रोजी फेरपडताळणी निश्चित करण्यात आली; मात्र स्थानिक ग्रामस्थांनी २ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन गावातील सरपंच, उपसरपंच यांच्या निवडीचा कार्यक्रम ९ सप्टेंबर रोजी असल्यामुळे गावातील संवेदनशीलता भंग न होण्यासाठी फेरपडताळणी पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यानुसार १0 सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्याचे निश्चित झाले आहे.
३८४ महिलांनी मान्यता दिल्यास दारूबंदीसाठी मतदान!
By admin | Updated: September 8, 2015 02:15 IST