चांडोळ (जि. बुलडाणा): गावातील कोरड्या पडलेल्या जुन्या विहिरीवर सुरु असलेले पाणी पुरवठय़ाच्या पाइप लाइनचे काम एका शेतकर्याने थांबविले. याप्रकरणी २ जून रोजी बुलडाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी गावाला भेट दिली असता, त्यांच्यासमोर विविध आरोप करीत सदर शेतकरी रामधन किसनसिंह रेकनोत यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला. ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत नळयोजना विशेष दुरुस्ती योजनेतून लोकवर्गणीमार्फत साडेआठ लाख रुपये मंजूर झाले होते. गावातील रामधन किसनसिंह रेकनोत या शेतकर्याच्या शेतात जुनी पाणी पुरवठय़ाची विहीर आहे. तेथून संबंधित कंत्राटदाराने पाइप लाइनचे कामही सुरू केले; परंतु या शेतकर्यानेच पाइप लाइनचे काम बंद पाडले. याबाबत १ जून रोजी सरपंच रामदास शेळके यांनी गटविकास अधिकारी संतोष लोखंडे व तहसीलदार दिपक बाजड यांना माहिती दिली. त्यानुसार गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी २ जून रोजी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी शेतकरी रामधन रेकनोत यांनी त्यांना सांगितले की, सदर जुनी विहीर माझ्या मालकीची असून, २0 वर्षांंपूर्वी वडिलांनी समाजसेवा म्हणून गावकर्यांना पिण्याच्या पाण्यासाठी खुली केली होती. ज्यावेळी गावात पाण्याची सोय होईल, त्यावेळी विहीर परत घेण्याचे ठरले होते. आता पाणीपुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायत सदर विहीर हस्तगत करण्यासाठी माझ्यावर दडपण आणत आहे, अशे तक्रार गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे करीत, रामधन रेकनोत यांनी न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला. त्यामुळे दोन्ही अधिकार्यांना कुठलीही कारवाई न करता, रिकाम्या हाती परतावे लागले.
पाइप लाइनचे काम बंद पाडले!
By admin | Updated: June 4, 2016 02:41 IST