लाखनवाडा (जि. बुलडाणा): शेतातील मजुरांचा डबा घेऊन जात असलेल्या दोघांना ७ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास बिबट्या दिसला. समोर बिबट्या पाहताच थरकाप उडालेल्या दोघांनी मोटारसायकल सोडून आरडाओरड केली. या घटनेची वार्ता गावात पसरताच २0 ते २५ नागरिकांनी बिबट्याचा पाठलाग केला. त्यामुळे बिबट्या तलावाच्या दिशेने धावत सुटला. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, काही नागरिकांनी रात्रीची गस्त दिली. लाखनवाडा येथील संदीप पांढरे व बंटी सावळे हे दोघे जण मोटारसायकलने रायधर तलावाजवळून मजुरांचा डबा घेऊन जात होते. दरम्यान, समोर बिबट्या पाहून अंगाचा थरकाप उडालेल्या या दोघांनी आरडाओरड केली. या दोघांची आरडाओरड ऐकून आसपासचे काही नागरिक तलावाच्या काठावर जमा झाले. त्यांनी बिबट्याचा पाठलाग केला. त्यामुळे हा बिबट्या तलावाकडील जंगलाकडे धावत सुटला. रात्रीची वेळ असल्यामुळे अंधारात बिबट्या जंगलात धावत गेल्यामुळे दिसून आला नाही. तत्पूर्वी बिबट्याने घारोड रोडवरील सद्गुरू नगरात फेरफटका मारल्याची चर्चा आहे. या बिबट्याच्या दहशतीने काही नागरिकांनी घराच्या बाहेर न निघणेच पसंत केले. याबाबतची माहिती गावकर्यांनी वन विभागाच्या पथकाला दिली आहे.
बिबट्यामुळे दहशत
By admin | Updated: March 8, 2016 02:32 IST