किशोर खैरे /नांदुरा बुलडाणा जिल्ह्यात भूदान यज्ञात मिळालेली जमीन अनेकांनी गैरमार्गाने खरेदी-विक्री केली आहे, असे प्रत्यक्ष पाहणीत आढळून येत असल्याने भूदानचे पट्टे ताब्यात असलेल्या ३५0 व्यक्तींना भूदान यज्ञ मंडळाचे अध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी व सदस्य वसंत केदार यांनी मंगळवारी नोटीस पाठवल्या आहेत. या नोटीसनुसार संबंधित पट्टेधारकांनी कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित पट्टा रद्द करून गरीब व भूमिहिनांना वाटून देण्यात येईल, असा इशारा भूदान यज्ञ मंडळाने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.विनोबा भावे यांनी १९५१ साली भूदान चळवळीची सुरुवात केली, त्यात विदर्भातून १ लाख ६0 हजार एकर जमीन भूदान यज्ञाला मिळाली तर संपूर्ण महाराष्ट्रात २ लाख १0 हजार एकर जमीन भूदानची आहे, या सर्व शेतजमीन हुडकून काढून भूमिहिनांना पुन्हा वहितीसाठी देण्याचे काम आचार्य हरिभाऊ वेरुळकर व त्यांचे सहकारी प्रामाणिकपणे करीत आहेत. संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील अनेक पट्टेधारकांनी संबंधित पटवार्यांना हाताशी धरुन भूदानऐवजी भूस्वामी वर्ग १ असा बदल करून भूदानच्या पट्टय़ाची सर्रास विक्री केली, तसेच अनेक ठिकाणी भूदान कायद्याच्या विरुद्ध अवैध हस्तांतरण व्यवहार आणि शासनाच्या रेकॉर्डवर चुकीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यात चार हजार ५00 एकर शेती भूदानची असून, प्रत्यक्षात मात्र २ हजार २७९ एकर जमीन भूदान यज्ञामध्ये मिळालेली आहे, उरलेली २ हजार २२१ एकर जमिनीचा थांगपत्ता लागत नाही, या जमिनीपैकी अनेक जमिनी या वहिवाटदारांनी सरकारी कर्मचार्यांना हाताशी धरुन विकल्या आहेत. वास्तविक भूदानची जमीन पडीत ठेवता येत नाही. इतरांना वहिवाटीसाठी देता येत नाही. वडिलोपाजिर्त वारसदारांना ती मिळत असते; मात्र जिल्ह्यातील भूदान जमीन अनेकांकडे पडीत आहे. ही तर काही पट्टेधारकांनी प्रत्यक्ष पडीत जमीन असतानाही ७/१२ वर मात्र वहीत असल्याचे दाखविले आहे. याबाबत पटवारी असा सातबारा कसा काय देतात, असा प्रश्न उपस्थित करून आचार्य वेरूळकर यांनी याबाबतची जिल्हाधिकार्यांकडे तक्रारही केली आहे.
अवैध पट्टे असणा-या ३५0 लोकांना भूदान यज्ञ मंडळाच्या नोटीस
By admin | Updated: February 24, 2016 02:13 IST