चिखली : केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी येथील डॉ. हेडगेवार आयुर्वेद रुग्णालयातील कोविड केअर सेंटरची गरज लक्षात घेता पाच कृत्रिम श्वसन यंत्र (नॉन इनव्हेजिव्ह व्हेंटिलेटर्सची) घेऊन नागपूरहून रुग्णालयास पाठविले आहे.
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित डॉ. हेडगेवार आयुर्वेद रुग्णालयामध्ये कोरोना महामारीच्या काळात कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. कोरोना साथरोगाच्या उद्रेकाची भीषण परिस्थिती लक्षात घेता, प्रशासनाच्या मदतीने रुग्णांकरिता रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणे मिळविण्यासाठी डॉ. हेडगेवार आयुर्वेद रुग्णालय प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. याअंतर्गत रुग्णालयास कृत्रिम श्वसन यंत्राची गरज असल्याने रुग्णालय प्रशासनाने केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे या यंत्राची मागणी केली होती. या मागणीची ना. गडकरी यांनी तातडीने दखल घेत रुग्णालयासाठी पाच कृत्रिम श्वसन यंत्र त्वरित नागपूरवरून चिखली येथे पाठविले आहे. रुग्णालयास सदर कृत्रिम श्वसन यंत्र मिळावेत यासाठी नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ना. गडकरी यांनी अत्यंत तत्परतेने कृत्रिम श्वसन यंत्र उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण शेटे, सचिव प्रेमराज भाला, कोषाध्यक्ष अॅड. विजय कोठारी, संचालक तथा चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त तसेच महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन मुंबईचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी ना. गडकरी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.