‘बेटी बचाओ’चा जागर; नऊ लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 03:05 PM2020-01-10T15:05:34+5:302020-01-10T15:05:46+5:30

याआधी ९२१ असलेले मुलींच्या जन्माचे प्रमाण आता ९३३ वर पोहचल्याचे आशादायी चित्र आहे.

Nine million Spent on Save girl child campaing in Buldhana | ‘बेटी बचाओ’चा जागर; नऊ लाखांचा खर्च

‘बेटी बचाओ’चा जागर; नऊ लाखांचा खर्च

Next

- योगेश देऊळकार 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात येत आहे. कलापथक व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात ‘बेटी बचाओ’ चा जागर होत असून यासाठी गतवर्षी तब्बल ९ लाख २७ हजारांचा खर्च करण्यात आला आहे. याआधी ९२१ असलेले मुलींच्या जन्माचे प्रमाण आता ९३३ वर पोहचल्याचे आशादायी चित्र आहे.
जिल्ह्यातील शहरीसह ग्रामीण भागात मुलींचा जन्मदर दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालला होता. या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्याची जबाबदारी प्रामुख्याने जि. प. महिला व बालविकास विभागाची आहे. या विभागाकडून यासाठी आवश्यक त्या उपाययोजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. जनजागृतीसाठी २०१८-१९ मध्ये पाच मोठे कार्यक्रम घेण्यात आले. फेब्रुवारी २०१८ मध्ये बुलडाणा येथे युथ गु्रप कार्यशाळा, ८ मार्च २०१८ रोजी चिखली येथे भव्य रॅली, वर्षभर ‘बेटी बचाओ’ च्या स्टीकरचे जिल्हाभरात वाटप, फेब्रुवारी २०१८ मध्ये नववधुंची कार्यशाळा तर याच महिन्यात अंगणवाडी सेविकांची कार्यशाळा घेण्यात आली. या माध्यमातून मुलीप्रमाणेच मुलींच्या जन्माचेही धुमधडाक्यात स्वागत करण्याचे आवाहन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांचा सकारात्मक बदल दिसून येत आहे. जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ९२१ असलेला मुलींचा जन्मदर आता ९३३ वर पोहचला आहे. यापूर्वी २०११ मध्ये मुलींचा जन्मदर अतिशय चिंताजनक होता. मुला-मुलींच्या जन्माचे लिंगगुणोत्तर प्रमाण दरहजारी पुरुषांमध्ये केवळ ८११ मुली असे होते. मुलींचा जन्मदर चिंताजनक असलेल्या राज्यातील १०० जिल्ह्यांमध्ये बुलडाण्याचा समावेश होता. यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रशाकीय स्तरावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे जवळपास १० वर्षांच्या कालावधीत आता मुलींचा जन्मदर समाधानकारक असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात तर काही ठिकाणी मुलांपेक्षा मुलींच्या जन्माचे प्रमाण अधिक असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील गावांचा समावेश होतो. या दोन्ही तालुक्यांमध्ये आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने असून ते मुलाप्रमाणेच मुलीच्या जन्माचे तेवढ्याच उत्साहात स्वागत करतात. मात्र हीच मानसिकता अगदी उलट असल्याने शहरी भागात मुलींचा जन्मदर अधिक चिंताजनक असल्याचे वास्तव सातत्याने समोर येत आहे.


स्थानिक मुलींना आयडॉल बनविण्याचा उपक्रम
महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येत आहेत. राज्य तथा राष्ट्रीय स्तरावरील कर्तबगार महिलांऐवजी स्थानिक पातळीवरील विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांची आयडॉल म्हणून निवड करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील मुलींना उत्तुंग भरारी घेण्यासाठी महत्त्वाची प्रेरणा मिळेल. एवढेच नव्हे तर अशा कर्तबागार महिला समाजासमोर आल्यास मुलांपेक्षा मुलगी कोणत्याही क्षेत्रात कमी नसल्याचा प्रत्यय येईल. यामुळे मुलींचा जन्मदर वाढण्यासाठीदेखील तेवढाच मोलाचा हातभार लागेल, यात शंका नाही.


एकाच महिन्यात ८० कार्यक्रमांचे सादरीकरण

जिल्ह्यात २०१९-२० मध्ये जनजागृतीपर कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे. या वर्षांत सर्वाधिक कार्यक्रम डिसेंबर महिन्यामध्ये घेण्यात आले. यामध्ये कलापथकाद्वारे नाटीका व १०१ मुलींचा नामकरण विधी यासह विविध समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचा समावेश असून हा आकडा ८० वर पोहचला आहे. यासाठी एका महिन्यात तब्बल चार लाखांचा खर्च करण्यात आला आहे.


याआधी बुलडाणा जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाकडे आलेला निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहत होता. आता या निधीचा योग्य विनियोग करण्यात येत आहे. निधी योग्य ठिकाणी खर्च करून स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण समसमान कसे होईल, यासाठी प्रशासन प्रयत्नरत आहे.
- अरविंद रामरामे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास
जि. प. बुलडाणा

Web Title: Nine million Spent on Save girl child campaing in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.