बुलडाणा, दि. २६- नवोदित लेखकांचे साहित्य प्रकाशित होणे, लेखकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन होणे आता बंद झाले असून, साहित्याला अवकळा आली असल्याचे मत बारोमासकार प्रा. डॉ. सदानंद देशमुख यांनी व्यक्त केले. नवोदितांना भाषा, साहित्य, संस्कृतीविषयक मार्गदर्शन या विषयावर परिसंवाद व कथाकथनाचा कार्यक्रम दुपारच्या सत्रात पार पडला. यावेळी मंचावर बारोमासकार प्रा. डॉ. सदानंद देशमुख, डॉ. शोभनाताई नाफडे, राम मोहिते, वंदना ढवळे, बबन महामुने, कडुबा बनसोड, साधना लकडे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा. देशमुख म्हणाले, की शालेय जीवनात मी कवितांचे वाचन केले. त्यानंतर मीही कविता लिहायला सुरुवात केली. जे शब्द मी माझ्या दैनंदिन जीवनात बोलत होतो. माझ्या गावात जी भाषा बोलल्या जात होती. तेच शब्द व तीच भाषा मी माझ्या साहित्यात मांडली. मी ४0 वर्षांंपूर्वी एक कविता केली होती. त्या कवितेला ४0 वर्षांनंतर अभ्यास मंडळात स्थान मिळाले आहे. त्यामुळे ४0 वर्षांंनंतर मी आता तीच कविता विद्यार्थ्यांंना शिकवित असल्याचे प्रा. देशमुख यांनी सांगितले. संचालन अरविंद शिंगाडे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. संगीता पवार यांनी मानले.
नवोदितांच्या साहित्याला अवकळा आली !
By admin | Updated: March 27, 2017 02:27 IST