ऑनलाइन लोकमत
हर्षनंदन वाघ /ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 6 - शहराच्या स्वच्छतेसोबत शारीरिक स्वच्छता महत्त्वाची असते. यासाठी शासनाने स्वच्छ भारत अभियानानंतर शारीरिक स्वच्छतेसाठी स्वच्छ मुख अभियान २३ जानेवारी पासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अभियान पुढील तिन
महिने सुरू राहणार असून यांची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागावर सोपविण्यात आली आहे. या अभियानात बुलडाणा जिल्ह्यातील २ हजार ३३२ शाळा सहभागी होणार आहेत.
पंतप्रधानांच्या संकल्पनेतून देशात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. या अभियानास सर्वस्तरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून, स्वच्छतेमुळे अनेक ठिकाणी आजाराचे प्रमाण कमी झाले. या अभियानाप्रमाणे शरीरिक स्वच्छता ठेवण्यास अनेक आजार उध्दभवणार नाहीत म्हणून शासनाने प्रत्येक शाळेत स्वच्छ मुख अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक
व्यक्ती शारीरिक स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहत नाहीत. धुम्रपान, तंबखूजन्य पदार्थ, गुटखा, अंमली पदार्थ, जंकफुडचे सेवन करतात. त्यामुळे मुखाचे विविध आजार निर्माण होतात. दिवसेंन्दिवस अशा आजारात मोठ्या प्रमाणात वाढत होत आहे. त्यामुळे मौखिक आजारासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व अरोग्य विभागाच्यावतीने राज्यस्तरावर स्वच्छ मुख अभियान-२०१७ सुरू करण्यात येणार असून त्याचे उद्घाटन २३ जानेवारी रोजी राज्यपालांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सदर
अभियान राज्यातील प्रत्येक शाळेत राबविण्यात येणार आहे. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १ हजार ४४८, नगरपालिकेच्या १०७ व खाजगी संस्थेच्या ७७७ अशा एकूण २ हजार ३३२ शाळांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांची दंत तपासणी व चर्चासत्राचे आयोजन
स्वच्छ मुख अभियान वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावास शासनाने १५ डिसेंबर २०१६ रोजी मान्यता देवून २३ जानेवारी २०१७ पासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अभियान वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभाग राबविणार असल्यामुळे या विभागाच्या पथकाकडून प्रत्येक विद्यार्थ्यांची दंत तपासणी तसेच समाजात मुख स्वच्छतेबाबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाची संपूर्ण जबाबदारी शासकीय दंत महिविद्यालयाच्या अधिष्ठातांवर राहणार असून शासकीय दंत रूग्णालयाच्यावतीन पुढील तीन महिने टप्प्याटप्प्याने दंत तपासणी शिबिरे आयोजित करून त्याचा अहवाल राज्यस्तरीय समितीला सादर करावा लागणार आहे.