चिखली (बुलडाणा) : गेल्या कित्येक दिवसांपासून चौपदरीकरणाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या खामगाव-जालना महामार्गाने आणखी एकाचा बळी घेतला आहे. सोमवार, २0 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास येथून जवळच असलेल्या मुरादपूर फाटानाजिक मोटारसायकल घसरून २८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. बुलडाणा येथील तानाजी नगर मच्छी ले-आऊटमधील प्रशांत रघुनाथ मंगळकर हा एमएच २८ व्ही ९६४९ या मोटारसायकलने देऊळगावराजाकडून चिखलीकडे येत असताना मुरादपूर फाटानजिक रस्त्यात अचानकपणे मोठा खड्डा आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व मोटारसायकल स्लीप होऊन रस्त्यावर तो फरफटत गेला. या अपघातात प्रशांत मंगळकर यास गंभीर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतकाच्या खिशातील आधार कार्डवरून ओळख पटल्यानंतर प्रशांतचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. रस्ता काम अर्धवट असल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळेच हा अपघात घडल्याची चर्चा आहे.
मोटारसायकल घसरून एक ठार
By admin | Updated: October 21, 2014 00:55 IST