मेहकर : तालुक्यातील बेलगाव येथे एका २६ वर्षीय मातेचा विहिरीत पडून संशयास्पद मृत्यू झाला. तर तिचा तीन वर्षीय मुलगा बेपत्ता असल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिसोड तालुक्यातील जांब आढाव येथील गीता संजय आढाव (२६) ही ज्ञानेश्वर संजय आढाव या आपल्या तीन वर्षीय मुलासह माहेरी बेलगाव येथे आलेली होती. आज दुपारच्या दरम्यान ती आपल्या मुलाला घेऊन शौचालयाकरिता बाहेर पडली. उशिरापर्यंत गीता परत आली नसल्याने तिची शोधाशोध घेण्यास सुरुवात झाली. दरम्यान, गावानजीकच्या विहिरीजवळ शौचास नेलेला डबा आढळून आला. त्यामुळे नातेवाईकांनी सदर विहिरीत गळ टाकून पाहिले असता गीता आढाव हिचा मृतदेह मिळून आला; परंतु तिच्यासोबत असलेल्या ज्ञानेश्वरचा शोध लागला नसून तो बेपत्ता आहे. यासंदर्भात परसराम आश्रुजी वानखेडे रा.बेलगाव यांनी डोणगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी १७४ जाफौनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तर ज्ञानेश्वर या तीन वर्षीय चिमुकल्याचा शोध सुरु होता. अधिक तपास मेहकर पोलिस करीत आहेत.
मातेचा मृत्यू , मुलगा बेपत्ता
By admin | Updated: September 16, 2014 18:35 IST