नीलेश शहाकार / बुलडाणा: समाजातील क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे; मात्र तरीही बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला क्षयरोगाचे ६0 पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याची माहिती पुढे आली आहे. बुलडाण्यात क्षयरोग निर्मूलनासाठी स्वतंत्र रुग्णालय असतानाही क्षयरोगासारख्या भयानक रोग जिल्ह्याला विळखा घालत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्याभरात क्षयरोग रुग्ण सर्वेक्षण कार्यक्रम सुरु आहे. एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस खोकला असल्यास अशा रुग्णास संशयित म्हणून थुंकीची तपासणी स्थानिक क्षयरोग प्रयोगशाळेत केली जाते. जिल्ह्यातील रुग्णांचा रक्तनमुना नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो. डॉट्स उपचार पद्धतीने अशा रुग्णांवर उपचार करुन त्यांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा क्षयरोगधाम येथे कॅट-१ व कॅट-२ या दोन उपचार पद्धतीने दर सहा महिन्यांनी रुग्णांची तपासणी केली जाते. तीन महिन्यांनी पुन्हा रुग्णांच्या परिस्थितीची माहिती घेतली जाते. आरोग्य विभागाने तयार केलेल्या वार्षिक अहवालात प्रत्येक महिन्याला ६0 क्षयरोग रुग्ण आढळून आले; तर वर्षभरात ८६३ रुग्णांना क्षयरोग आढळून आला आहे. सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग व क्षयरोग डॉ. के.एस.वासनिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी क्षयरोग रुग्णांकडून बर्याच वेळा औषध वेळेत घेण्याबाबत दुर्लक्ष केले जाते. औषधांच्या अनियमिततेमुळे टीबीच्या विषाणूंवर नियंत्नण येण्याऐवजी ते विषाणू अधिक प्रभावी झाले असल्याचे सांगीतले. गत तीन वर्षात जिल्ह्यात क्षयरुग्णांची संख्या बर्याच प्रमाणात कमी झाली असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. *जिल्हा आरोग्य विभागाच्या क्षय निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३ हजार ५७५ रुग्णांची संशयीत म्हणून क्षय रोगांसाठी थुंकी व रक्त तपासणी करण्यात आली. यात २ हजार ७१२ रुग्णांना क्षयरोग झाला नसल्याचे उघड झाले, तर ८६३ रुग्णांना क्षयरोग आढळून आल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
महिन्याला ६0 पॉझिटिव्ह रुग्ण
By admin | Updated: February 24, 2015 00:20 IST