मलकापूर (जि. बुलडाणा): तालुक्यातील अनेक रेशन दुकानदारांनी तीन महिन्यांचे धान्य लाभार्थ्यांना दिले नाही. याविरोधात ९ एप्रिल रोजी मनसेच्यावतीने पुरवठा विभागात उपोषण करण्यात आले. दरम्यान, धान्यवाटपाचे आदेश दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन ठोसर यांच्यासह पदाधिकार्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पुरवठा अधिकारी व कर्मचार्यांच्या संगनमताने रेशन दुकानदार मनमानी कारभार करीत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना तीन महिन्यांपासून धान्यच मिळाले नाही. याबाबत मनसेचे निवेदन देऊनही कोणतीच कारवाई न झाल्याने मनसे जिल्हा उपाध्यक्ष गजानन ठोसर यांच्यासह पदाधिकार्यांनी तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकार्यांच्या कार्यालयात उ पोषण करण्याचा इशारा दिला होता. निवेदनाची दखल न घेतल्याने गुरुवारी पुरवठा अधिकार्यांच्या कार्यालयात बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली. दुपारी उपोषणकर्त्यांना तहसीलदार जोगी यांनी भेटून रेशन दुकानधारकांवर तात्काळ कारवाई करून लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे धान्य देण्याचे सांगितले; मात्र उपोषणकर्त्यांनी तात्काळ धान्य द्या म्हणून पुरवठा अधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला असता, पुरवठा अधिकारी कुडके यांनी भ्रमणध्वनीवरून रेशन दुकानदारांशी संपर्क साधत त्या लाभार्थ्याला तात्काळ धान्य वितरीत करण्याचे सांगितले. त्यानुसार रेशन दुकानदार शे. शाहीद यांनी वंचित लाभार्थ्याला त्याचे मागील तीन महिन्याचे धान्य वितरित केले तसेच लाभार्थ्यांनी काढलेले विदर्भ क्षेत्रीय बँकेचे पती-पत्नीचे संयुक्त खाते मान्य करून त्यांची कागदपत्रे सबसिडीसाठी जमा करून घेण्यात आली.
पुरवठा विभागात मनसेचे आंदोलन
By admin | Updated: April 10, 2015 02:27 IST