चिखली : गेल्या चार वर्षांंपासून होणार्या अत्यल्प पावसामुळे तालुक्यातील सर्वच लहान-मोठे तलाव कोरडे पडले आहेत. पर्यायाने दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे, ही स्थिती पाहून हवालदिल होण्यापेक्षा दुष्काळाला इष्टापत्ती समजून गतवर्षांप्रमाणे यावर्षीही गाळ काढण्याची मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात येणार असून, सबंध राज्याचे लक्ष वेधल्या जाईल, असा गाळ यावर्षी काढण्यात येणार असल्याचा विश्वास आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला. जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा, तसेच तालुक्यात कोरड्या पडलेल्या जलाशयातील गाळ काढण्यासाठी स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात २४ फेब्रुवारी रोजी आ.राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार विजय लोखंडे, सहायक गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत, मंडळ कृषी अधिकारी हाके, जि.प.सदस्यद्वय अशोक पडघान, सुमित सरदार, अरविंद देशमुख, पं.स.सभापती सत्यभामा डहाके, उपसभापती कोकीळा परिहार, पं.स.सदस्य विमल लहाने, भानुदास घुबे, लक्ष्मण अंभोरे, राजू पाटील, राम डहाके, किशोर सोळंकी, ज्ञानेश्वर सुरूशे यांची प्रमुख उपस्थिती होती. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यानुषंगाने जिल्हय़ातील पहिली कार्यशाळा चिखलीत होत आहे. या कार्यशाळेला गावपतळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवकांची उपस्थिती तसेच अधिकारी व पदाधिकार्यांचा सहभाग पाहता जलाशयातील गाळ काढण्यासाठी अधिक सूक्ष्म नियोजन करून तालुक्यातील प्रत्येक जलाशयातील गाळ लोकसहभागातून काढणार असल्याचे आ.बोंद्रे यांनी स्पष्ट केले. प्रसंगी उपस्थित अधिकारी व पदाधिकार्यांनीही मार्गदर्शन केले. संचालन वाघ यांनी केले.
चिखलीची गाळ मोहीम राज्यासाठी दिशादर्शक!
By admin | Updated: February 25, 2016 01:46 IST