काशिनाथ मेहेत्रे/सिंदखेडराजा : मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत ४१८ व्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरातून जिजाऊ भक्त दाखल होत आहेत. जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला संभाजी व जिजाऊ ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यावरून मशाल यात्रा काढत जिजाऊंचा जागर करण्यात आला. या यात्रेमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड यांसह २0 शाखांचे पदाधिकार्यांसह हजारो जिजाऊभक्त जिजाऊ सृष्टीवर दाखल झाले आहेत. जन्मोत्सव सोहळ्याच्या पूर्वसंध्येला राजवाड्यावरून काढण्यात आलेल्या मशाल यात्रेत ४१८ मशालधारी जिजाऊ भक्त सहभागी झाले होते. यावेळी शहराच्या नगराध्यक्ष गंगा तायडे उपस्थित होत्या. प्रथम जिजाऊंना वंदन करून शोभायात्रेस सुरुवात झाली. शोभायात्रा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे यांच्या नेतृत्वात निघाली. दीपोत्सव जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. छाया महाले, प्रदेश अध्यक्ष वनिता अरबट, प्रदेश उपाध्यक्ष वनिता गायकवाड यांच्या नेतृत्वात संपन्न झाला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर, अपर पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी, ठाणेदार एम. एम. जाधव यांच्यासह शहरातील हजारो जिजाऊ भक्त उपस्थित होते.
मातृतीर्थावर मशाल जागर
By admin | Updated: January 12, 2016 02:06 IST