बुलडाणा: पोलीस कल्याण निधीसाठी आयोजित आर्केस्ट्राची बनावट तिकिटे छापल्याच्या प्रकरणी मास्टरमाइंड पोलीस पेट्रोलपंपाचा व्यवस्थापक पीएसआय बबन सनगाळे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात त्याला मुख्य आरोपी बनविण्यात आले असून, त्याला अटक करण्यासाठी शहर पोलिसांची कार्यवाही सुरू आहे.येथील पोलीस कवायत मैदानावर २८ फेब्रुवारी रोजी पोलीस कल्याण निधीसाठी आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. याच्या दोन दिवसाआधी २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी एक लाख रुपयाची बनावट तिकिटे जयस्तंभ चौकामधील नारखेड प्रिटिंग प्रेसमधून पोलिसांनी जप्त केली. तसेच प्रेस मालक पंकज नारखेड व सहकारी पुरुषोत्तम बोर्डे यांच्यावर भादंविच्या ४६८, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलीस कोठडीदरम्यान दोन्ही आरोपींकडे प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, प्रकरणाचा मास्टरमाइंट पीएसआय सनगाळे असल्याचे सत्य पुढे आले. कल्याण शाखेतील पीएसआय संगीता खेडेकर व हेकाँ नदीम काझी यांचे पीएसआय सनगाळे यांच्यासोबत अनेकदा वाद झाले होते. त्यामुळे खेडेकर व काझी यांचा वचपा काढण्यासाठी पीएसआय सनगाळे याने पोलीस कल्याण निधी आर्केस्ट्राची संधी निवडली. या आर्केस्ट्राच्या बनावट तिकिटा छापून हे कारस्थान रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले. टिकीट छापण्याची जबाबदारी असलेल्या नारखेड व बोर्डे यांना सनगाळे यांनी लक्ष्य बनवून हा कट रचल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणी पीएसआय बबन सनगाळे याला मुख्य आरोपी ठरवून पोलीस करवाई सुरू आहे.
पीएसआय सनगाळे निघाला मास्टरमाइंड
By admin | Updated: March 4, 2016 02:28 IST