मलकापूर (जि. बुलडाणा) : गेल्या दोन तपापासून मलकापूर विधानसभा मतदार संघात कमळ फुलविणारे तथा प्रदेश उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळणार्या आमदार चैनसुख संचेती यांची विस्तार होऊ पाहणार्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याचे संकेत आहेत. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी प्रसंगी त्यांना दिली जाण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. गेल्या एक वर्षापासून राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा चर्चेत आहे. सातत्याने जिल्ह्यातील भाजपच्या तीनही आमदारांची नावे मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासंदर्भात चर्चेत राहिली आहे. आता ३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात व त्यानंतरच्या मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला संधी मिळालेली नाही. अन्य अनुशेषाप्रमाणेच मंत्रीपदाचाही अनुशेष जिल्ह्याचा आहे. त्यानुषंगाने गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठनेते आमदार पांडुरंग फुंडकर व आमदार डॉ. संजय कुटे आणि आमदार चैनसुख संचेती यांच्या नावाची चर्चा राहिली आहे. तशी त्यांच्या नावाचीही चर्चा आहे. आमदार चैनसुख संचेती यांच्या नावावर पक्षश्रेठींचे एकमत झाल्याचे समजते. जनसंघाच्या काळापासून भाजापसोबत आमदार चैनसुख संचेती असून, २५ वर्षांपासून मलकापूर विधानसभेत ते भाजपचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. मलकापूर आणि भाजप असे समीकरण पूर्वीपासून दृढ झालेले आहे. प्रतिकूल काळात अनेक समस्यांना तोंड देत स्व. अर्जून वानखेडे, स्व. किसनलाल संचेती, स्व. दयाराम तांगडे यांनी या पक्षाची धुरा सांभाळत मतदार संघाचे नेतृत्त्व केले आहे. त्यामुळेच भाजपचा बालेकिल्ला म्हणून मलकापूरची ओळख आहे. यापूर्वी कधीच मलकापूरला लाल दिवा मिळालेला नाही.
मलकापूरला लाल दिव्याची गाडी !
By admin | Updated: December 2, 2015 02:23 IST