साखरखेर्डा येथील महालक्ष्मी मंदिर अगदी पुरातन काळातील प्राचीन मंदिर आहे. साखरखेर्डा या गावाला श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर व मंदिराजवळील तलावालादेखील महालक्ष्मीचा तलाव या नावानेच ओळखले जाते.
नवरात्रीच्या नऊ दिवस येथे असंख्य भक्तगण दर्शनासाठी येत असतात. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे साखरखेर्डा शहरातील निसर्गरम्य, थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. वनराईने हा परिसर बाराही महिने हिरवा शालू परिधान केलेला असतो. मंदिराजवळून जात असताना वाटसरू या ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी अर्धा तास ते एक तास थांबतात, अशी या महालक्ष्मी मंदिराची ओळख आहे. लाॅकडाऊनमुळे मंदिर बंद असल्याने या भागात सहसा कोणीही फिरकत नाही. काही लोक येथे मंदिराच्या भोवती बसून मद्यपान व धूम्रपान करतात. दारूच्या रिकाम्या बाटल्या परिसरात फेकून देतात. मंदिराच्या पवित्र ओट्यावर बसूनच धूम्रपान करायला घाबरतही नाही . या मंदिराचे पावित्र्य भंग करतात. अशा लाेकांवर कारवाई करण्याची मागणी पैनगंगा सहकारी सुत गिरणीचे कार्यकारी संचालक बबनराव लोंढे यांनी केली आहे.