किशोर मापारी । लोकमत न्यूज नेटवर्कराज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दिपक सावंत १० मे रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता लोणार ग्रामीण रूग्णालयास त्यांनी भेट दिली. याभेटी दरम्यान रुग्णालयाची पाहणी करत रुग्णांची भेट घेऊन त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. रुग्णालयातील समस्यांबाबत आढावा घेऊन अपुरे कर्मचारी व वैद्यकिय अधिकारी या विषया संदर्भात लवकरच उपाययोजनेचे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. परंतु ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना असुविधा मिळत असल्यामुळे आमदार डॉ.संजय रायमुलकर यानी यासंदर्भात अकोला आरोग्य सेवा मंडळ उपसंचालक डॉ.नितीन अंबाडेकर यांना कळवून वैद्यकीय अधिकारी व परिचारिका पदे भरण्यास सांगितले .वर्षभरापूर्वी २०१६ पर्यंत ग्रामिण रुग्णालय अनेक समस्यांमुळे सलाईनवरच होते. सुसज्ज इमारत, खाटांची सोय असतानाही रुग्णांचे हाल होत होते. यामुळे असंतोष पसरून नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. तरी त्यांच्याकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नसल्याचे दिसून येत होते. जिल्हा शल्य चिकित्सकांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे असताना तसे काही घडलेले दिसून आले नाही. पंरतु २०१६ मध्ये वैद्यकीय अधिकारी पदावर रुजू झालेल्या डॉ.मंगेश सानप यांनी लोणार ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सुविधा सुरळीत देण्यास मोठे योगदान दिले. त्यांनी प्रथम पाण्याचा प्रश्न निकाली लावत स्वच्छता राखली. सर्व कर्मचार्यांना शिस्त लावण्या बरोबरच येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा देण्यास भाग पाडले. परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश सानप यांची बदली होताच आणि कर्मचारी यांच्या कमी झालेल्या संख्यामुळे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सुविधा मिळत नसल्याचे दिसून आले. वैद्यकीय अधीक्षक यांचे पद रिक्त असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा कारभार हा एक महिला वैद्यकीय अधिकारी व दोन अधिपरिचारिका यांच्यावरच आहे. लोणार शहर जागतिक पर्यटन स्थळ असल्यामुळे याठिकाणी पर्यटक प्रवाशी वाहतूक मोठया संख्येने असते. यामुळे तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. १५ मे रोजी आमदार डॉ.संजय रायमुलकर, शिवछ्त्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी, शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे यांनी रिक्त पदाची माहिती घेत रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी आरोग्य उपसंचालक डॉ.नितीन अंबाडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांचेकडे केली.
लोणार ग्रामीण रुग्णालयाला रिक्त पदाचे ग्रहण
By admin | Updated: May 19, 2017 19:31 IST