लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : काेराेनाच्या काळात सर्वत्र लाॅकडाऊन, कडक निर्बंध असतानाही चार वर्षांतील अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरण हाेण्याच्या घटना पाहिल्या असता, यामध्ये घट झाल्याचे दिसून येते. २०१८ च्या तुलनेत काेराेना काळ म्हणजेच २०२० मध्ये मुली बेपत्ता, अपहरण हे प्रकार कमी झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढू नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंधांसह लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. लाॅकडाऊनच्या काळात अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरणाच्या तक्रारींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, काेराेनाच्या काळात यामध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.
सन २०१८ मध्ये जिल्ह्यातून एकूण ३५ मुली बेपत्ता झाल्या हाेत्या़ तसेच ९७ मुलींचे अपहरण करण्यात आले हाेते़. यांपैकी बेपत्ता झालेल्या ३३ आणि अपहरणाचा गुन्हा दाखल झालेल्या ९० मुलींना पाेलिसांनी शाेधून काढले़ या वर्षात १३२ पैकी १२३ मुलींना पाेलिसांनी शाेधून पालकांच्या स्वाधीन केले़ सन २०१९ आणि २०२० मध्ये प्रत्येकी १०१ मुलींचा शाेध पाेलिसांनी घेतला आहे़ २०२१ मध्ये मे महिन्यापर्यंत ३२ मुलींचा शाेध लागला आहे़
बेपत्ता किंवा अपहरणाचा गुन्हा याविषयीची तक्रारी गंभीरतेने घेण्यात येतात़ सन २०१८ पासून २०२१ मेपर्यंत ३५७ मुलींचा शाेध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे़ अनेक मुली प्रेमप्रकरणातून घरून निघून जातात़ पालकांनी सजग राहण्याची गरज आहे़
- अरविंद चावरिया
पोलीस अधीक्षक, बुलडाणा
९२ टक्के मुलींचा शोध लागला
सन २०१८ ते मे २०२१ पर्यंत एकूण ४४२ मुली बेपत्ता, अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात बहुतांश मुलींचा शाेध लागला असून याचे प्रमाण ९२ टक्क्यांच्या जवळपास आहे. केवळ आठ टक्के मुलींचा शाेध लागलेला नाही़
सन २०१८ पासून बेपत्ता, अपहरण झालेल्या ४४२ मुलींपैकी ३५७ मुलींचा शाेध लागलेला आहे. यामध्ये २०१८ मध्ये १२३, २०१९ मध्ये १०१, २०२० मध्ये १०१, तर २०२१ मध्ये ३२ मुलींचा शाेध घेण्यात यश आले आहे़
शोधकार्यात अडचणी काय?
बेपत्ता, अपहरण झालेल्या मुली कधीही लपून किंवा काेणाला न सांगता जात नाहीत. अल्पवयीन असल्याने त्यांना तेवढी समज नसते; परंतु ज्यांना त्या सांगून जातात, ते घाबरत असल्याने सांगण्यास टाळाटाळ करतात. यामुळे तपासकार्यात अडचणी येतात. तसेच अनेक मुली परत आल्यानंतर पाेलीस ठाण्याला माहिती देत नाहीत़