धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील सिंदखेडच्या सरपंच सीमा प्रवीण कदम यांनी गावकऱ्यांच्या लसीकरणासाठी, तसेच संशयित कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी स्वखर्चाने जीवनरक्षक रथ (व्हॅन) उपलब्ध करून दिला आहे.
मागील वर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांसाठी विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली होती. कोरोनापासून ग्रामस्थांचा बचाव व्हावा यासाठी सिंदखेड ग्रामपंचायत, तसेच लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात आले होते.
सरपंच सीमा कदम यांनी उपलब्ध करून दिलेल्या जीवनरक्षक रथाच्या माध्यमातून पिंपळगाव देवी येथील आरोग्य केंद्रांमधून सुमारे दोनशे जणांचे लसीकरण करण्यात आले.
तसेच गावामधे एखादा संशयित रुग्ण आढळल्यास त्या रुग्णाच्या तपासणीसाठी या वाहनाचा उपयोग केला जातो. १० जूनपासून हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली असून, याला लागणारा सर्व खर्च सरपंच सीमा कदम करीत आहेत. ग्रामस्थांचे जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वैराळकर प्रयत्नरत आहेत.
मागील दीड वर्षात गावकऱ्यांच्या सहभागातून करण्यात आलेल्या विविध प्रयत्नांना यश म्हणून कोरोना रोखण्यात मोठे यश मिळाले.
संभावित तिसऱ्या लाटेचा गावांमध्ये शिरकाव होऊच नये यासाठी प्रयत्नरत असल्याचे सरपंच सीमा कदम यांनी यावेळी सांगितले.
काेराेना राेखण्यासाठी विविध उपक्रम
सिंदखेड येथे काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपाययाेजना करण्यात येत आहे. ग्रामस्थांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले हाेते. या आवाहनाला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिल्याने गावात काेराेना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. यापुढेही नियमांचे पालन करून गाव काेराेनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प ग्रामंपचायतीने केला आहे.