बुलडाणा : अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे मेहकर तालुक्यातील मोहना खुर्द शिवारात १३ तर चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे, देऊळगाव साकर्शा शिवारासह आदी ठिकाणी २0 अशा एकूण ३३ जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना १ मार्च रोजी घडली. जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून कमी-जास्त प्रमाणात अवकाळी पाऊस सुरू आहे. याचा फटका पशुपालकांना बसला आहे. मेहकर तालुक्यातील शेंदला येथील गजानन रहाटे यांच्या शेतामध्ये पारखेड येथील संदीप जाधव हे त्यांच्याकडे असलेल्या ३00 गुरांना घेऊन थांबले होते. त्यातील चाराटंचाईमुळे कुपोषित १३ जनावरे थंडीत कुडकुडून शेतातच मृत्युमुखी पडली. याची माहिती संदीप जाधव यांनी दिली, त्यावरून गजानन रहाटे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डुगरेकर यांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तलाठी एस.एस. गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेमुळे संदीप जाधव यांचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथील विष्णू हरिभाऊ राठोड यांनी जनावरे चारण्यासाठी मंगरूळ नवघरे, ता. चिखली येथील गोपालदास खत्री यांच्या गावालगतच्या शेतामध्ये खतावर बांधण्यासाठी एक खंडी १२0 रुपये प्रमाणे २0 ते २५ खंड्या जनावरे आणली होती; परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे २८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान पडलेल्या पावसाने व थंडीने सदर १६ गायी व चार वासरांचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकारी अमडापूर व मंगरूळ नवघरे येथील तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन मृत जनावरांचा पंचनामा केला. तसेच अहवाल तहसीलदार चिखली यांना दिला आहे.
अवकाळी पावसाचा फटका, ३३ जनावरांचा मृत्यू
By admin | Updated: March 3, 2015 01:31 IST