शेगाव ( जि. बुलडाणा) : खामगाव येथील एस.टी. आगारप्रमुख रवींद्र दगडू खेडेकर यांनी ५५ टक्के अपंग असतांना खोटे प्रमाणपत्र सादर करुन परिवहन विभागाकडून वाहन चालक परवाना प्राप्त केलेला होता. याबाबत माहिती अधिकारात माहिती प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी तक्रारीनंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बुलडाणा यांनी खेडेकर यांचा वाहनचालक परवाना एका आदेशान्वये रद्द करण्यात आला आहे अशी माहिती तक्रार कर्ते यांना परिवहन महामंडळाने शुक्रवारी दिली आहे. खामगाव येथील आगार व्यवस्थापक रवींद्र खेडेकर हे पायाने ५५ टक्के अपंग असताना त्यांनी परिवहन विभागाकडे फिटनेस बाबतचे खोटे कागदपत्रे सादर करुन नॉनट्रान्पोर्ट आणि ट्रान्सपोर्ट हे वाहनचालक परवाना मिळविला म्हणून त्यांचा परवाना रद्द करुन त्यांच्या विरुध्द फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी मनसेचे माजी विभागीय अध्यक्ष प्रमोद पोहरे यांनी तक्रारीद्वारे केली होती. शिवाय मुंबई येथील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशाराही दिला होता. त्यानुसार चौकशी अंती आदेश क्रमांक ४१/२0१५ जा.क्र.२३५८ नुसार खेडेकर यांचा परवाना रद्द करण्यात आल्याचे पोहरे यांना कळविण्यात आले आहे. दरम्यान तक्रारकर्ते प्रमोद पोहरे यांनी सांगीतले की,परवाना रद्द केला आता खोटे कागदपत्रे सादर करुन शासनाच्या फसवणुकी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे अन्यथा परिवहन कार्यालयासमोर आमरण उपोषण आपल्याला करावे लागणार आहे.
खेडेकरांचा वाहनचालक परवाना रद्द
By admin | Updated: June 6, 2015 00:39 IST