चिखली (जि. बुलडाणा): जिल्हय़ात सर्वत्र पावसाअभावी खरिपाची पिके कोमेजून जात असून, शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत असल्याचे विदारक चित्र आहे; मात्र शेतकर्यांना अशा बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागणार, याची जाणीव असलेल्या माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या दूरदृष्टीमुळे तालुक्यातील सुमारे तीन हजार हेक्टरवरील पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी ऐनवेळी कालव्यात सोडल्या गेल्यामुळे लाभक्षेत्रातील अनेक शेतकर्यांची पिके वाचविण्यात यश आले आहे.खरिपाच्या पेरणीपूर्वीच माजी मंत्री भारत बोंद्रे यांनी गतवर्षाप्रमाणे यावर्षीही निसर्गाने अवकृपा केल्यास खरीप हंगामात किमान दोन वेळा पाणी देण्याची वेळ आल्यास शेतकर्यांना मदतीचा हात देण्यासाठी खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी खरीप हंगामाकरिता राखीव ठेवून खरीप हंगाम आवर्तन कार्यक्रमाची आखणी करण्यात यावी, अशी मागणी पांटबंधारे विभागाकडे केली होती. दरम्यान, तालुक्यात पेरणीपश्चात पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. ही परिस्थिती शेतकर्यांवर ओढावणार, याची बहुदा जाणीव असलेल्या भारत बोंद्रे यांनी गत महिन्यात पाटबंधारे विभागाकडे केलेल्या मागणीचा तातडीने पाठपुरावा केल्यामुळे जलसंपदा विभागाने खकडपूर्णा प्रकल्पाचे पाणी कालव्यात सोडण्याचा निर्णय घेऊन ९ जुलैपासून कालव्यात पाणी सोडल्यामुळे लाभक्षेत्रातील सुमारे तीन हजार हेक्टरवरील खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्यास मदत झाली असून, भारत बोंद्रे यांच्या दूरदृष्टीमुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे.
खरीप पिकांना मिळाली नवसंजीवनी
By admin | Updated: July 15, 2015 01:20 IST