खामगाव: शेतीची सुपीकता, कस वाढावा, यासाठी शेतकर्यांनी धरण, तलाव, बंधार्यांतून मोठय़ा प्रमाणात मोफतमध्ये गाळ उपसून आपल्या शेतात टाकावा, असे आवाहन आ. अँड. आकाश फुंडकर यांनी केले. पिंप्री गवळी लघुप्रकल्पातील लोकसहभागातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ शिवजयंतीच्या पावन पर्वावर १९ फेब्रुवारी रोजी आ.अँड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. फुंडकर पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांंमध्ये अवकर्षणामुळे तालुक्यातील जलस्रोताची पातळी घटली आहे. त्यामुळे शेतकर्यांना आपली शेती सुपीक करण्यासाठी नैसर्गिक गाळ या जलसाठय़ात उपलब्ध आहे. शेतकर्यांना हा गाळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. मोफत गाळ नेण्यासाठी शेतकर्यांनी सहकार्य करून योजना यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रभाकर बेंडे, तहसीलदार आकाश लिंगाडे, तालुका कृषी अधिकारी जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष शरदचंद्र गायकी, पंचायत समिती सदस्य सुशीलाताई फुंडकर, बाजार समिती संचालक दिलीप पाटील, सरपंच शीला इंगळे, किशोर भोसले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
खामगाव तालुक्यात लोकसहभागातून काढणार गाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 02:12 IST