खामगाव : येथील नगर पालिकेच्या सर्व साधारण सभेच्या ठरावांच्या प्रती देण्यास मुख्याधिकारी टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. मात्र, या आंदोलनाचा काहीच उपयोग न झाल्याने, बुधवारी सकाळी काँग्रेस-आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्याधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. या पार्श्वभूमीवर खामगाव पालिकेतील राजकारण आता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचल्याची चर्चा होत आहे. येथील नगर पालिकेच्या सर्व साधारण सभेच्या ठरावांच्या प्रती देण्यात टाळाटाळ करण्यासोबतच, काँग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले यांना पालिकेत तात्कळत ठेवल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सायंकाळी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात साडेतीन तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, या आंदोलनाची मुख्याधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे काँग्रेस-आघाडीच्या नगरसेवकांनी बुधवारी सकाळी बुलडाणा येथे धडक दिली. सकाळी १० वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून मुख्याधिकाऱ्यांची तक्रार केली.यामध्ये काँग्रेस-आघाडीचे नगरसेवक देवेंद्रदादा देशमुख, प्रवीण कदम, भूषण शिंदे, भारिपचे नगरसेवक विजय वानखडे, इब्राहिम खान, अ. रशीद आदी नगरसेवकांचा समावेश होता.
खामगाव पालिकेतील ‘राज’कारण पोहोचले जिल्हाधिका-यांच्या दालनात!
By admin | Updated: April 19, 2017 17:58 IST