खामगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक वजन काटे खरेदीत घोटाळा झाल्याचे तक्रारीवरून सभापती, उपसभापती, सचिवासह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी सभापती व सचिवास शनिवारी अटक करण्यात आली होती. दरम्यान, या दोघांनाही रविवारी येथील न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गत नोव्हेंबर महिन्यात खामगाव कृउबासमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे खरेदी करण्यासाठी बाजार समितीच्यावतीने वृत्तपत्रात जाहीर नोटिस देऊन नामांकित कंपन्यांच्या अधिकृत विक्रेत्यांकडून दरपत्रक मागविण्यात आले; परंतु यामध्ये सर्वात कमी दराचे दरपत्रक सादर करणार्या कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे खरेदी करण्याचे प्रावधान असताना बाजार समितीकडून प्रो.प्रा. महालक्ष्मी सेल्स यांचे ज्यादा दराचे दरपत्रक मंजूर करण्यात आले. बाजारात ७000 रुपये प्रतिनग या दराने उपलब्ध असलेले वजन काटे बाजार समितीने तब्बल १४,४५0 रुपये प्रतिनग दराने १00 वजन काट्यांची खरेदी करण्यात आली. यामध्ये ज्यांचेकडून वजन काटे खरेदी करण्यात आले, ते महालक्ष्मी सेल्स हे कंपनीचे अधिकृत विक्रेते नसल्याचे व त्यांनी दिलेला पत्ता बनावट असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. यासंदर्भात बाजार समितीचे संचालक प्रकाश टिकार व अशोक हटकर यांनी ३ जानेवारी २0१७ रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांच्याकडे तक्रार केली होती. सदर तक्रारीवरून झालेल्या चौकशीनंतर खामगाव येथील सहकारी संस्थांचे सहायक निबंधक महेश कृपलानी यांनी शनिवार, ६ मे रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सभापती संतोष टाले, उपसभापती नीलेश दीपके, संचालक विलास इंगळे, प्रमोद चिंचोळकर, सचिव दिलीप देशमुख व महालक्ष्मी सेल्स तर्फे प्रोप्रायटर रा. मोरगाव दिग्रस ता. शेगाव यांच्याविरुद्ध भादंवि कलम १२0 ब , ४0६, ४२0, ४६५, ४६८, ४७१, ४७७ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी सभापती टाले व सचिव देशमुख यांना अटक केली होती. दरम्यान, रविवारी कृउबास सभापती व सचिवास येथील न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने या दोघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
खामगाव कृउबास सभापती, सचिवास पोलीस कोठडी
By admin | Updated: May 8, 2017 02:26 IST