लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तालुक्यातील कोलद येथील ६३ के.व्ही. ची डीपी गेल्या आठ दिवसांपासून जळालेली असल्यामुळे १० दिवसांपासून कोलद गाव हे अंधारातच आहे; मात्र १० दिवस उलटूनही महावितरण कार्यालय संग्रामपूरकडून या गावात नवीन डीपी बसविण्यात आलेली नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.कोलद येथील महावितरण कंपनीची डीपी गत दहा दिवसांपासून बिघाड होऊन जळालेली आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत. गावातील नागरिकांना रात्र-रात्र भर लाईट गुल असल्यामुळे जागरण करावे लागत आहे, तर गावातील वृद्ध तसेच लहान मुलांनासुद्धा उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात घरातील कूलर, पंखे बंद पडलेले आहेत. त्यामुळे लहानापासून मोठ्यांपर्यंत व आजारी नागरिकांना घराच्या बाहेर झोपावे लागत आहे. गावातील विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे १० दिवसांपासून नळाचे पाणीही बंद आहे, तसेच गावातील पीठगिरण्या बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना दळण दळून आणण्यासाठी ५ ते ६ किलोमीटर दुसऱ्या गावामध्ये पीठगिरणीवर जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. १० दिवस उलटूनही महावितरण कार्यालयाकडून नवीन डीपी बसविण्यात आलेली नसल्यामुळे नागरिक रोष व्यक्त करीत आहेत, तरी संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.गत दहा दिवसांपासून गावातील डीपी जळालेली असल्यामुळे व बिघाड झालेला असल्यामुळे गाव दहा दिवसांपासून अंधारातच आहे; मात्र महावितरण कंपनीकडून त्याची कुठलीही दखल घेतल्या जात नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.- गोपाल सोनोने, सरपंच, कोलद.
१० दिवसांपासून कोलद गाव अंधारात!
By admin | Updated: June 8, 2017 02:29 IST