नीलेश शहाकार/ बुलडाणा जिल्ह्यातील पाटबंधारे विभागातंर्गत येणार्या मलकापूर, खामगाव, मेहकर, चिखली येथील लघू पाटबंधारे प्रकल्प तसेच सर्वेक्षण उपविभागांतर्गत नाला, कालवे या विभागांची विविध श्रेणीचे ४७५ पदे मंजूर आहेत. मात्र यातील २४२ पदे अद्यापही रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम प्रकल्पाच्या कामांवर होत आहे. सिंचन व्यवस्थेवर परिणाम होत आहे.जिल्ह्यात चार मोठे प्रकल्प, चार मध्यम प्रकल्प व १२ लघू पाटबंधारे योजना कार्यरत असून, यातून जिल्ह्यातील नागरिकांची पाण्याची तहान भागविली जाते. शिवाय या प्रकल्पातून शेतीच्या सिंचनासाठी पाणी राखीव करण्यात येते. मात्र जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष दिवसेंदिवस वाढत असताना जलसंपदा विभागातील अनेक पदे अद्यापही रिक्त आहेत, याचा परिणाम सिंचनावर झाला आहे.परिणामी, जिल्ह्यातील आलेवाडी, अरकचेरी, निम्न ज्ञानगंगा, जिगाव धरण, खडकपूर्णा आदींचे बांधकाम काहीअंशी रखडले आहे. विशेष म्हणजे प्रकल्पस्थळावर काम करणारे शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता, मोजणीदार, कालवा निरीक्षक, चौकीदार यांच्यासह कार्यालयीन पदे अद्यापही भरली गेली नाही. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून रिक्त अभियंत्यांच्या पदावर नव्या नेमणुका करण्यात येतात. मात्र, गत तीन वर्षांच्या काळात बुलडाणा पाटबंधारे विभागातील रिक्त पदांवर नेमणुका झाल्या नाही. या रिक्त पदांचा विपरीत परिणाम विभागातील सिंचन प्रकल्पांच्या बांधकाम व सुरक्षेवर होत आहे. शिवाय प्रशासकीय स्तरावरून पाठपुरावा होत नसल्यामुळे रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावून अनुशेष दूर करण्याचे प्रमाण कमी आहे.
सिंचन प्रकल्पांची कामे रिक्त पदांमुळे प्रभावित!
By admin | Updated: April 22, 2016 02:26 IST