सिंदखेड राजा : तालुक्यातील राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक व स्व. भास्करराव शिंगणे उच्च माध्यमिक विद्यालयातील गजानन संपतराव खंडारे या शिक्षकाने अमरावती येथील शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
राजेगाव येथील स्व. भास्करराव शिंगणे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात प्रा . गजानन खंडारे हे कार्यरत होते . स्थानिक सचिव व प्राचार्य यांनी कोणतेही ठोस कारण न दर्शविता त्यांना कमी केले. याबाबत त्यांनी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे लेखी तक्रारसुध्दा केली होती. परंतु यांच्या तक्रारीची दखल कोणीच घेतली नाही . आठ ते दहा वर्षांपासून ते लढा देत आहेत. मात्र, कोणीही दखल घेत नसल्याने गजानन खंडारे यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. तसेच मुख्याध्यापक तथा प्राचार्य यांच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत याची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी २६ जानेवारीपासून गजानन खंडारे आपल्या दोन लहान मुले, पत्नी यांच्यासह अमरावती शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयाच्या समोर बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत. सचिन खंडारे, बबन सरकटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल मोरे तसेच हिवरा आश्रम येथील गजानन मोरे यांनी त्यांची भेट घेतली .
फोटो :---- अमरावती येथे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले गजानन खंडारे आणि कुटुंबीय.