बुलडाणा : तुर्णांमध्ये वाढदिवस साजरे करण्याचे एक वेगळेच फॅड सध्या सुरू असून, तलवारीने केक कापणे, त्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणे व पोलिसांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांच्यावरही अरेरावी करणाऱ्या अशा गुंडप्रवृत्तीच्या युवकांची सोशल मीडियावर गुंडागर्दी वाढत आहे. मात्र, अशा प्रकारचे वाढदिवस साजरे करणाऱ्यांवर सायबर पोलिसांचे विशेष लक्ष आहे.
तलवारीने केक कापण्याची फॅशन
तलवारीने केक कापण्याचे फॅशन प्रचंड रूढ झाली आहे. युवकांच्या टोळक्यांकडून तलवारीने केक कापण्याची फॅशन ज्याप्रकारे वाढली त्याच प्रमाणात पोलीसही त्यांच्यावर कटाक्षाने लक्ष देऊन आहेत. पोलिसांनी कारवाई करताच ती तलवार लाकडी किंवा प्लास्टिकची असल्याचा खुलासा करण्यात येतो. विशेष म्हणजे बुलडाणा पोलीस सोशल मीडियावरील गुंडावर कारवाईसाठी तत्पर असल्याची माहिती आहे.
कट्टा तलवार अन चाकू
तलवारीने केक कापताना देशी कट्टा वापरणे, चाकू व तलवार वापरतानाचे फोटो, तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करतात. मात्र, बुलडाणा पोलीस अशांवर कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी तत्पर आहेत.
लाईक करणारेही येतील अडचणीत
तलवारीने केक कापणाऱ्यांचा व्हिडीओ तसेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर त्यांना लाईक करणारे व कमेंट करणारेही अडचणीत येणार आहेत. त्यामुळे अशा गुंडांपासून दूरच राहिलेले बरे, अशी वेळ सध्या आली आहे.
बुलडाण्यात एकही गुन्हा दाखल नाही
बुलडाणा जिल्ह्यात तलवारीने किंवा कोणत्याही हत्याराने केप कापण्याचे प्रकार घडले नाहीत. अशांवर कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, तरीही पोलिसांचे विशेष असे लक्ष राहणार असल्याची माहिती आहे.
समाजाला भीती वाटेल अशा कोणत्याही हत्याराने केप कापणे, त्याचा व्हिडीओ बनविणे, कट्टा किंवा चाकू घेऊन तो सोशल मीडियावर टाकणे अशांवर सायबर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. जबाबदार व्यक्तींनी यापासून दूर रहावे.
- विलास सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सायबर सेल.