उद्धव फंगाळ - मेहकर बुलडाणा जिल्ह्यातील वन परिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. मेहकर व लोणार तालुक्यातील वन क्षेत्रामध्ये अडजात वृक्षाच्या कत्तलीनंतर सदर लाकडाची वाहतूक परजिल्ह्यात होत आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात व तामिळनाडू या राज्यातही येथील लाकडांची विक्री होत आहे. शासन दरवर्षी वृक्ष लागवड करण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. यावर शासनाचे लाखो रुपये खर्च होत आहेत. वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्यासाठी विविध मार्गाने जनजागृती करण्यात येते. मात्र, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा शासनाचा उपक्रम बुलडाणा जिल्ह्यात केवळ कागदोपत्रीच सुरु असल्याने शासनाचे लाखो रुपये वाया जात आहेत. मेहकर व लोणार तालुक्यातील वन परिक्षेत्रात व इतर ठिकाणावरुन विविध जातीच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करुन इतर जिल्ह्यासह परराज्यातही मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत आहे. संबंधित वृक्षतोड ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने हा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याने जंगलाचा ऱ्हास होत आहे. बुलडाणा व अकोला जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या घाटबोरी वन परिक्षेत्र तसेच लोणार तालुक्यातील धाड वन परिक्षेत्रात वृक्षाची मोठ्या प्रमाणात तोड सुरू आहे. या भागात सागवनसह बाभूळ, निंब ही झाडेही मोठ्या प्रमाणात आहेत. या भागातून सागवान, निंब, बाभूळ ही झाडे तोडून त्याची बुलडाणा जिल्ह्याबाहेर तसेच परराज्यात विक्रीसाठी नेल्या जात आहेत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात व तामिळनाडू या राज्यात येथील लाकडांची विक्री होत आहे. १ ते २ झाड तोडण्याचा परवाना काढून त्या परवान्याच्या आधारे व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन जादा झाडे तोडण्यात येत आहेत. या प्रकारामुळे शासनाच्या उपक्रमाचा बोजवारा उडाला आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे व अर्थपूर्ण व्यवहारामुळे वृक्ष तोडीचा हा व्यवसाय सुरू असून, यामुळे जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने व्यवसाय सुरु असल्याने तक्रारी करुनही त्याचा काही उपयोग होत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षतोड मोठ्या प्रमाणात वाढत आहे.‘त्या’ साडेआठ हजार वृक्षांचे काय झाले?शासनाने मागील वर्षी मोठा गाजावाजा करुन बुलडाणा जिल्ह्यात १ जुलै २०१६ रोजी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला. मेहकर तालुक्यासाठी जवळपास साडेआठ हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यावेळी मेहकर तालुक्यात सर्व शासकीय यंत्रणेने वृक्ष लागवड केली होती. परंतु लावलेल्या वृक्षांपैकी किती वृक्षांचे त्या-त्या शासकीय यंत्रणेने संगोपन करुन वृक्ष जिवंत ठेवले, हे पाहणे तितकेच गरजेचे आहे. गतवर्षी वृक्षलागवड झालेल्या ठिकाणी सध्या केवळ ट्रीगार्ड उरले आहेत. आरामशीनची चौकशी करावी!मेहकर व लोणार तालुक्यात असलेल्या आरामशीनवर ठिकठिकाणी सध्या लाकडाचे ढीग पडलेले आहेत. ही लाकडे नेमकी आली कोठून, त्यकडाचा परवाना होता का? तसेच किती लाकडे व कोणत्या जातीची लाकडे तोडण्याचा परवाना होता, याची वरिष्ठांकडून चौकशी करुन संबंधितांकडून कारवाईची मागणी होत आहे.वृक्षतोडीला आळा घालून वृक्षलागवडीसाठी प्रशासनाकडून सदैव प्रयत्न करण्यात येत आहेत. तरी अवैध वृक्षतोड करताना कुणी आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.-पी.सी. निर्मल, लागवड अधिकारी, मेहकर.