- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: रस्ता विस्तारीकरणात ‘मॉन्टे कार्लो’ लिमिटेडने अवैध गौण खनिज उत्खनन केल्याचा ठपका ठेवीत, याप्रकरणी तात्काळ तांत्रिक तपासणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह भारतीय राजमार्ग प्राधिकरणाला खामगाव तहसीलदारांनी पत्रदिले आहे. त्यामुळे ‘मॉन्टे कार्लो’च्या स्थानिक व्यवस्थापनात एकच खळबळ उडाली आहे. ‘जान्दू’कन्स्ट्रक्शन कंपनीनंतर आता ‘मॉन्टे कार्लो’कंपनीचा अवैध गौण खनिज उत्खननाचा घोळ चव्हाट्यावर येणार असल्याचे संकेत आहेत.बुलडाणा जिल्ह्यातील विविध रस्ते तसेच महामार्गाचे विस्तारीकरण करताना कंत्राटदार कंपन्यांकडून मोठ्याप्रमाणात अवैध गौण खनिजाचे उत्खनन केले जात आहे. ‘जान्दू’ कंन्स्ट्रक्शन कंपनीने खामगाव-बुलडाणा-अंजिठा महामार्गासाठी ७०२९ ब्रास गौण खनिजाचे उत्खनन केल्याचे सिध्द झाले. याप्रकरणी जान्दूला ७ कोटी ३१ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. दरम्यान, टेंभूर्णा-शेलोडी-पारखेड-चिखली घोडसगावपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण करताना ‘मॉन्टे कार्लो लिमिटेडकडून टेंंभूर्णा शिवारातील गट नं ११४ आणि ११५ मध्ये उत्खनन करण्यात आले. उत्खनन करताना मोजणी आणि सीमांकन करून कामास सुरूवात केली नाही. तसेच ३ मीटर खोलीपेक्षा खोदकाम केल्याची गंभीर नोंद तलाठी आणि मंडळ अधिकाºयांनी संयुक्त चौकशी अहवालात नमूद केली. तथापि, २१ हजार ५०० पेक्षा अधिक गौणखनिजाच्या उत्खनन प्रकरणी आता तांत्रिक तपासणीसाठी महसूल प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ‘जान्दू’ कन्स्टक्शन कंपनीनंतर आता ‘मॉन्टे कार्लो’ कंपनीच्या अवैध उत्खननाच्या तांत्रिक तपासणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
अनधिकृत अकृषक वापराचाही होणार पंचनामा!-‘मॉन्टे कार्लो’ कंपनीने रस्ता विस्तारीकरण करताना वाणिज्यक परवानगी घेतली नसल्याचे तलाठी टेंभूर्णा आणि मंडळ अधिकारी आवार यांनी संयुक्त अहवाला नमूद केले आहे. परिणामी, अनधिकृत अकृषक वापराबाबत नियमानुसार वेगळा स्थळदर्शक नकाशा व शेतजमिनीचे ७/१२ संबंधित शेतमालकाचे आणि कंपनीच्या बयाणासह अहवाल सादर करण्याचे निर्देश खामगाव तहसीलदार यांनी आवार येथील मंडळ अधिकाºयांना दिले आहेत.