रेती उत्खननाकडे महसूल अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने रेती उपसा करण्याचा ठेका घेतलेले ठेकेदार त्याचप्रमाणे रेतीची तस्करी करणारे रेती तस्कर यांचे चांगलेच फावत आहे. एक पावती देऊन दिवसभर उपसा करण्याचा प्रकार या भागात सुरू आहे. रॉयल्टीच्या अर्धे पैसे देऊन वाहतूक सुरू असल्याचे दिसून येते. महसूल कर्मचाऱ्यांनी ही पावती दिवसभर तपासू नये, मंडळ अधिकारी, तलाठी महसूल विभागाचे कर्मचारी पोलीस या सर्वांचेच याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. अनेकवेळा रेती वाहतूक व उत्खननाबाबत तक्रारी करण्यात येतात, जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणे करण्यात आले. परंतु वाहनाची साधी पावती तपासण्यापुरतासुद्धा वेळ या अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळत नाही. सिंदखेडराजा, देऊळगावराजा व मराठवाड्याचा काही भाग या ठिकाणावरून सर्रास हे लोक एक पावती घेऊन ठेकेदाराला पावतीच्या अर्धे पैसे देऊन दिवसभर आपली वाहने रेती वाहतुकीवर चालवितात. ॲडजेस्टमेंटच्या नावाखाली रेतीचा हा गोरखधंदा या भागात चांगलाच वाढलेला आहे. अनेक लोकांनी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार दिली आहे. परंतु कारवाई होत नसल्याचे तक्रार करायची तरी कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे सध्या रेती वाहतूकबाबत ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा प्रकार सुरू आहे.
खडकपूर्णा नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:34 IST