कोरोना महामारीची दुसरी लाट अतिशय गंभीर असून, दिवसेंदिवस बुलडाणा जिल्ह्यातील, ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. राज्य शासनाने कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे बुलडाणा शहरातील व परिसरातील हॉटेल, खानावळ यांना देखील मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालय परिसरातच मोफत जेवण देण्यासाठी हालचाली करत दररोज २०० डबे मोफत जेवण देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. २३ एप्रिल रोजी जालिंधर बुधवत यांनी बुलडाणा येथील कोविड सेंटरला भेट देऊन तिथल्या अतिदक्षता विभाग, जनरल वॉर्ड, लॅब, ऑक्सिजन स्टोअरेज प्लांटची पाहणी केली. अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा करून त्यांना येणाऱ्या अडीअडचणी, सुविधासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात संपर्क साधून समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांना दिले. स्टोअरेज प्लांट पाहणीप्रसंगी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याशी चर्चा केली. ऑक्सिजन टँकर दाखल झाल्याने मोठा दिलासा जिल्ह्याला मिळाला आहे. आणखी एक कोरोना तपासणी केंद्र हे पूर्ववत मूकबधिर विद्यालयाच्या परिसरात सुरू करण्याच्या सूचनादेखील याप्रसंगी करत वॉररूम अधिक क्षमतेने कार्यान्वित करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी रामामूर्ती यांच्याकडे केली. जिल्ह्याच्या जामनेर या सीमावर्ती भागातून तसेच अजिंठाकडील काही ग्रामीण भागातूनही बुलडाणा येथे रुग्णालयात रुग्ण येत आहेत. रुग्णालयावरचा वाढता ताण पाहता, अधिक बेड वाढविणे, या संदर्भातही सीएमओ कार्यालयात मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख लखन गाडेकर, जिल्हा प्रवक्ता गजानन धांडे, डॉ. वासेकर, डॉ. पाटील व कर्मचारी उपस्थित होते.
रुग्णालयात दोन हजार जेवणाच्या डब्यांची व्यवस्था करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST