चिखली : तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींचे सन २०२० ते २०२५ या कालावधीकरिताचे सरपंचपदाचे आरक्षण (महिला सरपंच आरक्षण वगळता) २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे यांच्या अध्यक्षतेखाली निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, आरक्षण आपल्या बाजूने निघेल या आशेने अनेकांनी प्रयत्न सुरू केले हाेते. त्यांचा आज हिरमाेड झाला.
यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी महिमळ, दिवठाणा, किन्होळा, अमडापूर, सवणा, मंगरूळ नवघरे, शेलोडी, शेलसूर, सोनेवाडी, धोत्रा भनगोजी, असोला बु., आंधई, भोगावती, हरणी, धोत्रा नाईक, करवंड, देऊळगाव धनगर, भानखेड, पिंपरखेड, किन्ही नाईक, तोरणवाडा, वैरागड, किन्ही सवडत, साकेगाव आदी ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी पांढरदेव, मेरा बु., बोरगाव काकडे, कव्हळा, रोहडा, मालगणी, डासाळा, धोडप, डोंगरशेवली, बोरगाव वसू, नायगाव बु., रानअंत्री, गुंजाळा, कोनड, एकलारा, कोलारा, येवता, बेराळा, वळती, खैरव, मंगरूळ (ई.), शेळगाव आटोळ, शिंदी हराळी, चंदनपूर, धानोरी, अंचरवाडी, टाकरखेड हेलगा (नामाप्र महिला) तर सर्वसाधारणसाठी पेठ, माळशेंबा, शेलगाव जहाँगीर, अंत्रीकोळी, ब्रम्हपुरी, गांगलगाव, गोदरी, सावरगाव डुकरे, भरोसा, मेरा बु., सोमठाणा, तेल्हारा, अंबाशी, अमोना, इसरूळ, मुरादपूर, चांधई, हातणी, कवठळ, इसोली, करणखेड, केळवद, पळसेखड दौलत, डोंगरगाव, सावंगी गवळी, मनूबाई, मोहदरी, भोरसा-भोरसी, भोकर, भालगाव, सातगाव भुसारी, काटोडा, मुंगसरी, अंत्री खेडेकर, खोर, टाकरखेड मुसलमान, मिसाळवाडी, उत्रादा, दहिगाव, नायगाव बु., खंडाळा मकरध्वज, करतवाडी, उंद्री, वरखेड, शेलूद, पाटोदा, मलगी, आमखेड. याप्रमाणे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
अनेकांचा पत्ता कट
निवडणुकीपूर्वी जाहीर आरक्षणानुसारच आताही आरक्षण जाहीर होईल, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, आज जाहीर झालेले सरपंचपदाचे आरक्षण आणि पूर्वीच्या आरक्षणामध्ये अंशता बदल झाल्याने अनेकांना एकप्रकारे लॉटरी लागली आहे. तर अनेक इच्छुकांचा हिरमोड देखील झाला आहे. दरम्यान, यावेळचे सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीपश्चात जाहीर झाल्याने निवडणुकीतील चुरस काही प्रमाणात कमी झाली. अनेक इच्छुकांनी पॅनल न टाकणे पसंत केले. परिणामी निवडणुकीतील स्पर्धा कमी होण्यासह निवडणुकीवरील वारेमाप खर्चही वाचला आहे. दरम्यान, आजच्या आरक्षणातून आपल्यालाच लॉटरी लागेल या आशेवर अनेकजण होते. मात्र, सोडत जाहीर झाल्यानंतर अनेकांचा पत्ता कट झाला आहे.