डोणगाव: डोणगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या सर्व्हे नं. १२३ मध्ये व्यापाऱ्यांनी अवैध बांधकाम सुरू केले होते. त्यावर डोणगाव ग्रामपंचायतने १ व ४ फेब्रुवारी रोजी व्यापाऱ्यांना नोटिस देऊन अवैध बांधकाम करू नये, म्हणून नोटिस बजावल्या होत्या. तरीही व्यापाऱ्यांनी गाळे बांधकाम केले होते. यावर डोणगाव ग्रामपंचायतीने व्यापाऱ्यांविरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशनला तक्रार करून अवैध गाळे बांधकामप्रकरणी गुन्हे दाखल केले होते. तरीही व्यापाऱ्यांनी गाळ्याचे बांधकाम करून सदर गाळ्यात अनधिकृतपणे ताबा करून व्यवसाय सुरू केले होते. यावर १९ एप्रिल रोजी डोणगाव ग्रामपंचायतने सदर जागा ही शासनाची असल्यामुळे आपण सरकारी जागेवर अतिक्रमण करून अवैध गाळे बांधकाम केले आहे. आपणाला यापूर्वी नोटिस देऊनसुद्धा आपण बांधकाम बंद केले नाही. सदर नोटिस मिळताच तीन दिवसांच्या आत गाळे खाली करण्यात यावे. सदर गाळ्यामधील आपले साहित्य ताब्यात घ्यावे. सदर गाळे हे पाडावयाचे आहे. गाळे पाडण्यात होणाऱ्या आर्थिक व जीवित हानीस आपण स्वत: जबाबदार राहाल, अशी सक्त ताकीद गाळेधारकांना देण्यात आली आहे. दरम्यान, तीन दिवसानंतर सदर गाळे पाडले जाणार असल्याच्या धास्तीने गाळेधारकांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे.
अवैध गाळे पाडण्यासाठी ग्रामपंचायतने दिली व्यापाऱ्यांना नोटिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2017 23:56 IST