बुलडाणा : डीएड्साठी विद्यार्थी मिळत नसल्याने मराठी माध्यमांच्या अध्यापक विद्यालयांवर संक्रांत आली आहे. मात्र दुसरीकडे उर्दू अध्यापक विद्यालयांना अच्छे दिन आले आहेत. गतवर्षीच्या शिक्षक भरतीमुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंत उर्दू अध्यापक विद्यालयातील ९२ टक्के जागा भरल्या आहेत. त्यामध्ये ९० टक्के प्रवेश हे मुलींचेच असल्याने उर्दू डीएड्कडे मुलींचा कल वाढत असल्याचे दिसून येते. गेल्या दहा वर्षांपासून अध्यापक विद्यालयांची वाईट स्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थी मिळत नसल्याने अनेक कॉलेज बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. शासनाकडे संस्थेकडून बंद करण्याचा प्रस्ताव आल्यानंतरच संबंधित अध्यापक विद्यालय बंद करण्यात येते. परंतु असे प्रस्ताव संस्थाचालक पाठवत नसल्याने राज्यातील अनेक अध्यापक विद्यालय केवळ नावालाच सुरू आहेत. बुलडाणा जिल्ह्यातही अध्यापक विद्यालयातील मराठी माध्यमांच्या शासकीय कोट्यातील ९३८ जागा रिक्त आहेत. व्यवस्थापन कोट्यातील ३३६ जागा अद्यापर्यंत रिक्त आहेत. बहुतांश कॉलेजमध्ये तर एकही जागा भरलेली नाही. परंतु उर्दू माध्यमाच्या अध्यापक विद्यालयामध्ये याउलट चित्र आहे. बुलडाणा जिल्ह्यात उर्दू अध्यापक विद्यालयांमध्ये आतापर्यंत १३० पैकी १२० जागा भरल्या आहेत. त्यामध्ये ९० जागांवर मुलींनी प्रवेश घेतला आहे. उर्दू डीएड् करण्याची गोडी आता मुलींमध्ये निर्माण होत आहे.
राज्यात ५४६ उर्दू शिक्षकांची भरती
मागील वर्षी राज्यात उर्दू शिक्षकांच्या ९०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यापैकी ५४६ जागा भरण्यात आल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ४५ उर्दू शिक्षकांची भरती करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेमुळे या शैक्षणिक वर्षामध्ये उर्दू माध्यमाच्या डीएड्च्या जागा रिक्त राहण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.
उर्दू अध्यापक विद्यालयातील १२० प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यापैकी ९० टक्के प्रवेश मुलींचेच आहेत. लवकरच सर्व जागा भरण्यात येतील. सध्या अध्यापक विद्यालयांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- डॉ. विजयकुमार शिंदे, प्रचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा
उर्दू माध्यमाच्या एकूण जागा : १३०
भरलेल्या जागा : १२०
शासकीय कोटा एकूण जागा : ४०
भरलेल्या जागा : ३०
व्यवस्थापन कोटा एकूण जागा : ९०
भरलेल्या जागा : ९०