बुलडाणा : भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जनतेच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय टेलीकन्सल्टेशन सेवेद्वारे ऑनलाइन ओपीडी सेवा सुरू केली आहे. नॅशनल टेलीकन्सल्टेशन सर्व्हिसद्वारे रुग्णांना त्यांच्या आजारावर पाहिजे असलेला सल्ला किंवा उपचाराबद्दल माहिती रुग्णालयात न जाता, घरातल्या घरात मिळणार आहे. त्यासाठी पाेर्टल व मोबाइल ॲप विकसित करण्यात आले आहे.
वेबसाइट किंवा ॲपचा उपयोग करून ऑनलाइन उपलब्ध असलेल्या डॉक्टरांशी ऑडिओ–व्हिडीओद्वारे सल्ला-मसलत करून रुग्ण त्यांच्या आजारावर विनामूल्य सल्ला घेऊ शकणार आहेत. रुग्णाच्या वेगवेगळ्या आजारावर या सेवेद्वारे सल्ला दिला जातो, तसेच ई-प्रिस्क्रिप्शन दिले जाते. सध्याच्या कोरोना साथीमध्ये ही सेवा खूप उपयोगाची ठरणार आहे. रुग्णाला रुग्णालयात न जाता, घरच्या घरी त्यांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेता येणार आहे. या सेवेसाठी डॉक्टर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपरोक्त पोर्टल व ॲपवर उपलब्ध असतात.
ई-संजीवनी ओपीडी ठळक वैशिष्ट्ये
रुग्णांची नोंदणी, टोकन निर्मिती, रांग व्यवस्थापन, डॉक्टरांशी ऑडिओ-व्हिडीओ सल्लामसलत, ई-प्रिस्क्रिप्शन, एमएमएस, ईमेल सूचना, राज्याच्या डॉक्टरांद्वारे विनामूल्य सेवा, शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे सदर सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तडस यांनी केले आहे.