जानेफळ : फळांचा राजा आंब्याला यावर्षी पोषक वातावरणाअभावी मोहरच लागला नसल्याचे चित्र जानेफळ परिसरात आहे. मोहरच फुटला नसल्याने गावरान आंब्याची चव दुर्मीळ होणार आहे.
मध्यंतरी बिघडलेल्या वातावरणामुळे आंब्याच्या पिकावर मोठा परिणाम झालेला आहे. झाडांना ऐन मोहर लागण्याच्या वेळेलाच अवकाळी पाऊस तसेच ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे याचा मोठा फटका बसला आहेे. या शिवाय दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडी पडण्यास सुरुवात होत असते. परंतु डिसेंबर महिना संपत असला तरी पाहिजे त्या प्रमाणाात थंडी पडलेली नाही. रात्री थंडी व दुपारी उष्मा यामुळे झाडांवर ताण येऊन मोहोर प्रक्रिया सुरू होते. ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत हिवाळा ऋतूू असल्याने मकर संक्रांतीनंतर हवामानात बदल होत जातो. हिवाळ्यातील शेवटचा महिना शिल्लक राहिल्याने थंडी पडणार कधी व मोहर लागणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहेे.
जानेफळ परिसरात मोठ्या प्रमाणात गावरान आंब्याची झाडे आहेत. त्यामुळे दरवर्षी मुबलक प्रमाणात गावरान आंबे जानेफळ परिसरात विक्रीस येत असतात. उन्हाळ्यात सर्वत्र गावरान आंब्याच्या रसाचीच मेजवानी राहत असते. परंतु यामुळे यावर्षी मात्र गावरान आंब्याच्या रसाची मेजवानी चाखायला मिळणार की नाही, याबाबत शंका आहे.