बुलडाणा : नशीब अन् निसर्ग यावर शेतकरी सर्वाधिक विसंबून राहिला; मात्र या दोघांनीही शेतकर्यांना नेहमीच फटका दिला आहे. दुष्काळाचे संकट हे कुठल्याना कुठल्या रूपात जिल्ह्यावर येत असून या जोखडातून स्वातंत्र्य कधी मिळणार, अशी चिंता सर्वानांच लागून आहे. गेल्यावर्षी बुलडाण्यात गाळ काढण्याची मोहीम यशस्वी झाली. पावसानेही भरभरून हजेरी लावली त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता संपूर्ण उन्हाळय़ात जाणवली नाही. आता पावसाने उघाड दिल्याने दुष्काळ दाटून आला आहे. उडीद, मूग हातचा गेला, सोयाबीन, कपाशी तुरळक पावसावर तग धरून आहे. पावसाने दमदार हजेरी लावली नाही तर जमिनीतील ओलही सुकून जाईल त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त झाला आहे. पीक विम्याची मुदत वाढवून दिली नसल्याने सोयाबीन सारख्या पिकाला संरक्षणही मिळाले नाही, त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेणे गरजेच आहे.* पावसाळा सुरू झाल्यापासून आज १४ ऑगस्टपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात केवळ २३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरी ३३ टक्के एवढाच आहे. पावसाचे दिवस संपत आले असल्याने दुष्काळ गडद झाला आहे.*जिल्हाभरात आजपर्यंत ९५ टक्के पेरणी झाली आहे; मात्र पावसाच्या लहरीपणामुळे सर्व पेरणी धोक्यात आहे.*सोयाबीन व कापूस हे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे पीक असून, २ लाख ८३ हजार हेक्टरवर सोयाबीन तर २ लाख ४४ हजार ४00 हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे.*जिल्ह्यातील जलसाठा हा दोन महिन्यापर्यंत पुरेसा आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होऊ शकतो.*सोयाबीनच्या पेरणीचा कालावधी संपल्याचे कारण दाखवित पीक विमा नाकारल्या जात आहे.
दुष्काळाच्या जोखडातून हवे स्वातंत्र्य
By admin | Updated: August 14, 2014 23:48 IST