चिखली : तालुक्यातील मेरा बु. येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक शेतकर्यांच्या कर्ज पुर्नगठणास अडथळा निर्माण करीत कर्ज मंजुरीसाठी टोलवा टोलवी सुरू केल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. चंदनपूर व परीसरातील १५0 पेक्षा जास्त शेतकर्यांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यास नकार देत सदर खातेदार सेंट्रल बँकेकडे वर्ग केल्याचे कारण देवून त्यांना टाळले जात होते. त्यामुळे युवक कॉग्रेसच्या पदाधिकार्यांनी शेतकर्यांसह व्यवस्थापकांना घेराव घालून याबाबत आमदार राहुल बोंद्रे यांनी माहिती दिली असताना आ.बोंद्रेनी महाराष्ट्र बँकेच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून बँक व्यवस्थापकाला योग्य त्या सूचना करण्यास बाध्य केल्याने सुमारे १५0 शेतकर्यांच्या कर्ज पुर्नगठणाची प्रकरणे निकाली लागली. तालुक्यातील मेरा बु. येथील बँक ऑफ महाराष्ट्र मधे चंदनपूर व परिसरातील अनेक शेतकर्यांची गत पाच ते सात वर्षापासून खाते असतांना व त्यावर त्यांनी पिक कर्ज घेतलेले असतांना मागिल वर्षी गारपिटीमुळे झालेले शेतकर्यांचे नुकसान पाहता त्या शेतकर्यांचे कर्ज पुर्नगठीत करून त्यांना पिक कर्ज देण्यात यावे असे शासनाचे निर्देश असतांनाही जवळपास १५0 चे वर शेतकर्यांना या हंगामासाठी कर्जाचा लाभ केवळ व्यवस्थापकाचे असहकार्यामुळे मिळू शकला नाही. वारंवार बँकेत शेतकरी चकरा घालत असतांनाही तुमचे खाते सेंट्रल बँकेकडे चिखली येथे वर्ग करण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही तेथूनच कर्ज घ्या असे उत्तर व्यवस्थापक देत होते. मात्र बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मेरा बु. चे थकीत कर्जदार असल्याने सेंट्रल बँक ही त्यांना कर्ज देत नव्हती तर त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रचा निलचा दाखला मागत होते. अशा विचित्र अडचणीत सापडलेल्या या शेतकर्यांना कर्ज मिळणे दुरापास्त झाले होते. परिणामी त्रस्त शेतकर्यांनी युवक कॉग्रेस कार्यकर्त्यांकडे सदर प्रकरण मांडले. त्यावर तात्काळ युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष तुषार भावसार, स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार बोंद्रे व इतर सहकर्यांनी चंदनपूरच्या १५0 शेतकर्यांसह बँक कार्यालय गाठले व याप्रकरणी व्यवस्थापकाकडे विचारणा करता येणारी असंबध्द उत्तरे पाहून त्यांना घेराव घालण्यात आला व जोपर्यंत या प्रकरणांचा निकाल लागत नाही तोपर्यंत बँक कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका घेवून तेथेच ठिय्या मांडला. दरम्यान याबाबत आमदार राहुल बोंद्रे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ दखल घेत कार्यवाहीच्या सूचना केल्या.या आंदोलनात शेतकरी व युवक कॉग्रेसच्या पदाधिकार्यांसह फिरोज खान, सागर खलसे, अनु नकवाल, उमेश खरे, अकिल खॉन, आनंद पाटील, बंडु शिंदे व श्याम कुसाळकर यांनी सहभाग घेतला होता.
१५0 शेतकर्यांच्या कर्ज पुनर्गठनाचा मार्ग मोकळा
By admin | Updated: August 10, 2014 00:19 IST